केज दि.१ – शहरातील सतरा वर्षीय युवकास मलेरिया झाल्याने त्याचे उपचारा दरम्यान दिनांक ३१ ऑगस्ट रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास निधन झाले.
केज शहरातील जि. प.चे शिक्षक विवेक ढोकर यांचा मुलगा यश विवेक ढोकर हा सतरा वर्षीय युवक नुकताच ९८% टक्के गुण घेऊन १२ वी उत्तीर्ण झाला होता.आणि डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहत नीट ची तयारी करत होता. परंतु मागील पाच दिवसांपूर्वी थंडी ताप आल्याने केज शहरातील खाजगी रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यास मलेरिया झाल्याचे निदान झाले होते. उपचारा दरम्यान त्याची प्रकृती खालावल्याने त्यास लातूर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना त्याचे ३१ ऑगस्ट रोजी वाटेतच उपचारापूर्वीच निधन झाले.
त्याच्यावर बुधवारी केज येथील क्रांती नगर येथील स्मशाभूमीत अंत्यविधी करण्यात आले. अभ्यासात अतिशय हुशार आणि नीट मध्ये १००% यशस्वी होण्याची खात्री असलेल्या यश च्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.