Site icon सक्रिय न्यूज

आणखी तीन दिवस वरूणराजचा मुक्काम…..!

आणखी तीन दिवस वरूणराजचा मुक्काम…..!

बीड दि. 6 – ऑगस्ट संपता संपता महाराष्ट्राला वरुणराजाने काहीसा दिलासा दिला आहे. महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची हजेरी बघायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासात तीव्र होत आहे. तसेच पूर्व पश्चिम वाऱ्यांचा वेग चांगला असल्यानं दक्षिणेसह संपूर्ण महाराष्ट्रात पुढील 4-5 दिवस चांगल्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. देशासह महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून चांगला पाऊस होत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता काही अंशी कमी झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यात मागील 2-3 दिवसापासून मुसळधार पाऊस बघायला मिळत आहे. त्यात काल मराठवाड्यातील अनेक धरणांच्या पाणीपातळीत देखील चांगली वाढ झाली आहे.

कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासात चक्रीय स्थितीत याचे रुपांतर होत असल्याने विदर्भात आजपासून पुढील 2 दिवस काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात देखील पुढील 4-5 दिवस चांगला पाऊस बघायला मिळू तर काही ठिकाणी अतिवृष्टीची देखील शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

मध्य महाराष्ट्रात देखील पुढील 4-5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यात 8 सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. उद्यासाठी मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर 7 आणि 8 सप्टेंबर रोजी अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. ज्यात सातारा, पुणे आणि नाशिकसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला गेला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधारेची शक्यता देखील आहे.

दरम्यान, मराठवाड्यात मागील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस बघायला मिळत आहे. काल बीडमध्ये 150 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर औरंगाबाद आणि लातुरात 110 मिमी पावसाची नोंद बघायला मिळाली आहे. पुढील 3 दिवस देखील मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. ज्यात प्रामुख्याने उत्तर मराठवाड्यात 7 सप्टेंबर ते 9 सप्टेंबरपर्यंत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधारेचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

शेअर करा
Exit mobile version