Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यातील ‘या’ गावात ना दोन मजली घर ना चून्याची विक्री…..!

केज तालुक्यातील ‘या’ गावात ना दोन मजली घर ना चून्याची विक्री…..!
केज दि.5 (अशोक शिंदे) – पोळ्याला अनेक गावांत आजही मान पान पाहायला मिळतात. बैलाच्या मिरवणुकीमुळे अनेक गावात मोठी भांडणे होतात. मात्र याला अनेक वर्षापासून अपवाद ठरले आहे केज तालुक्यातील बोरगाव बु. हे दोन हजार लोकसंख्येचे गाव …..! येथे मानासाठी कोणीच पुढे यायला तयार होत नाही हे विशेष. कारण गावातील श्रद्धा स्थान असलेल्या बुद्रुक साहेब याच्या महात्म्याने येथील पोळा
श्रद्धेचा सोहळा ठरत आला आहे. तर खास वैशिष्ट्य म्हणजे या गावात दोन मजली घर बांधले जात नसून चून्याची सुद्धा विक्री केली जात नाही. तर कमानीतून कठाळ्या गेल्या शिवाय पोळा फुटत नसल्याचे चित्र या गावात पाहायला मिळत आहे.
                 बीड आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्याच्या मांजरा नदीच्या किनारी वसलेले दोन हजार लोकसंख्येचे केज तालुक्यातील बोरगाव बुद्रुक हे गाव आपली वेगळी ओळख ठेवून आहे . हिंदुबहुल या गावात श्रद्धा आहे ती बुद्रुक साहेब यांच्या दर्ग्यावर. गावातील लहान थोर गुरुवार, शुक्रवार या दिवशी दर्शनासाठी गावाच्या पूर्वेस असलेल्या या ठिकाणी जातात. या श्रद्धेपोटी पोळ्याला कटाळयाला मान देण्याची प्रथा आजही कायम आहे. गावाच्या बाहेर हनुमान मंदिरा समोर भरणारा पोळा कठाळ्या गावातील मुख्य वेशीवर बांधलेले तोरण पार करून गावात प्रवेश करीत नाही तोपर्यंत शेतकरी आपल्या बैलांसह मंदिर परिसरातच थांबलेले असतात. मात्र नेमका यादिवशी हा कठाळ्या मोठा भाव खातो तास – दोन तास तो हुलकावणी देत उपवासाने भुकेलेल्या शेतकऱ्यांना ताटकळवतो. अनेकदा पावसातही शेतकऱ्यांना भिजत थांबावे लागले.
             दरम्यान, गत दोन वर्षांपूर्वी या अनेक वर्षाच्या परंपरेला कटाळ्या नसल्याने गालबोट लागले होते. शेतकऱ्यांनी मात्र वेस न ओलांडताच माघारी फिरणे पसंत केले होते. यावेळी काही दिवसापूर्वी नागरिकांनी गावात कठाळ्या सोडल्याने यावर्षीचा पोळा पुन्हा श्रद्धेचा सोहाळा ठरणार आहे. गावात या श्रद्धेने कोणीच दोन मजली घर बांधले नाही शिवाय चून्याची विक्री करण्याचे धाडस कोणी केले नाही. श्रद्धेला जातीपातीचे बंधन नसते हेच या गावचे वेगळेपण म्हणावे लागेल.
शेअर करा
Exit mobile version