पुणे दि.7 – आरोग्यमंत्री राजेश टोपे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. राजेश टोपे यांनी चाकणमधील एका खासगी रुग्णालयाला भेट दिली. आरोग्यमंत्र्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील कोरोना स्थिती, कोरोना प्रतिबंधक लसीकरण आणि शाळा सुरु करण्यासंदर्भात विविध मुद्यांवर त्यांनी भाष्य केलं. राज्यातील पुणे, मुंबई, रत्नागिरी, सातारा आणि अहमदनगर या जिल्ह्यांना आणखी सतर्क राहण्याची गरज असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्येपैकी सत्तर टक्के रुग्ण या जिल्ह्यांमध्ये असल्यानं कोरोना सुसंगत वर्तन, लसीकरणाला प्राधान्य आणि नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचं राजेश टोपे म्हणाले.
राज्यातील पुणे, मुंबई, रत्नागिरी, सातारा आणि अहमदनगर या जिल्ह्यांना आणखी सतर्क राहण्याची गरज आहे. कारण, या पाच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसेना. आजच्या तारखेला तर राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत याच जिल्ह्यांचा सत्तर टक्के वाटा आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी केलंय. त्याअनुषंगाने या पाच जिल्ह्यांनी कोरोना नियमांचं तंतोतंत पालन करण्याची गरज असल्याचं टोपे यांनी नमूद केलंय.
दरम्यान, डॉ. प्रभू यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्स आहे, त्यांनी एसओपी दिलेली आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं शंभर टक्के लसीकरण होणं आवश्यक आहे. संपूर्ण शाळा सॅनिटाईज करावी, विद्यार्थ्यांची उपस्थिती कशी असावी, यासंदर्भातील सूचना शालेय शिक्षण विभागाला दिल्या आहेत. शालेय शिक्षण विभागानं यासंदर्भातील प्रस्ताव दिला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात निर्णय घेतील, असं राजेश टोपे म्हणाले.