नवी दिल्ली दि.10 – देश अजूनही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी लसीकरण हेच प्रभावी हत्यार आहे. त्यामुळे कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी सध्या लसीकरणावर भर दिला जात आहे. अशातच आता कोरोना लसीकरणामुळे मृत्यूचा धोका कमी झाला असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात येत आहे.
कोरोनाच्या संसर्गाचा पुन्हा एकदा जोर वाढला असून अनेक देशांमध्ये संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे लसीकऱणावर जोर दिला जात आहे. आता केंद्र कोविड व्हॅक्सिन ट्रॅकर लाॅन्च करणार आहे. या ट्रॅकरमध्ये व्हॅक्सिनच्या होणाऱ्या परिणामाबद्दल आठवड्याचा अपडेट मिळेल. या ट्रॅकरमुळे व्हॅक्सिन घेतली किंवा न घेतल्यानं कोरोनामुळे मृत्यूचा धोका किती आहे हे समजू शकेल. इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे प्रमुख बलराम भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी घेतलेल्या कोरोनाच्या पहिल्या डोसमुळे मृत्यूचा धोका 96.6 टक्के आणि दुसऱ्या डोससह 97.5 टक्के कमी झाला आहे.
दरम्यान, सणासुदीच्या दिवसांनंतर देशात कोरोना साथीची स्थिती आणखी बिकट होईल, अशी शक्यता लक्षात घेऊन सध्या तशी पूर्वतयारी केली जात आहे. मात्र सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता सध्या नाही, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.