औरंगाबाद दि.१२ – खरिपातील पिकांना पावसाचा फटका बसल्यानंतर बळाराजा हवालदिल झाला होता. यातच झालेल्या नुकसानीची तक्रार दाखल करायची कशी असा पेचही निर्माण झाला. शिवाय दिवसागणिस नियामवलीत बदल होत असल्याने संभ्रम अवस्थेतील शेतकऱ्यांना आता कृषी आयुक्तालयाकडूनच दिलासा मिळाला आहे. नु्कसानीची तक्रार नोंदिवण्यासाठी आता वेगवेगळे सहा पर्याय शेतकऱ्यांसमोर राहणार आहेत.
खरिप हंगामातील पिके ही शेवटच्या टप्प्यात असताना मराठवाड्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीनंतर पेच होता तो झालेल्या नुकसानीची पिक विमा कंपनीकडे तक्रार नोंदवायची कशी? सुरवातीस केवळ ऑनलाईनद्वारेच तक्रार नोंदण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, स्थानिक पातळीवर नुकसानीसंदर्भातील सर्व माहिती ही अॅपद्वारे भरणे शक्य नाही. शेतकऱ्यांच्या तक्रारी लक्षात घेता पुन्हा ऑफलाईनही तक्रार नोंदिवता येणार असल्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. शेतकऱ्यांची होणारी गर्दी आणि तारांबळ पाहता आता कृषी आयु्क्तालयानेच वेगवेगळे सहा पर्याय दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे. चला तर मग पाहू काय आहेत ते सहा पर्याय.
@ शेतकऱ्यांना ‘क्रॉप इंन्शुरन्स ऍप’ यामाध्यमातून झालेल्या नुकसानीची माहिती स्व:ता भरायची आहे. याद्वारे माहिती भरल्यानंतर अधिकारी कर्मचारी हे पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर येणार आहेत.
@ विमा कंपनीने 18004195004 हा टोल फ्री क्रमांक दिला आहे. याद्वारेही शेतकरी झालेल्या नुकसानीची माहिती सांगू शकतात.
@ तालुक्याच्या ठिकाणी विमा कंपनीच्या कार्यालयात शेतकरी हे ऑफलाईनही तक्रार करु शकतात. कंपनीकडून देण्यात आलेल्या फॅार्मवर आवश्यक ती माहिती भरावी लागणार आहे.
@ शेतकऱ्यांना कृषी कार्यालयातही तक्रार नोंदिवता येणार आहे. संबंधित मंडळ कृषी अधिकाऱ्याकडे तक्रारीचा अर्ज द्दावा लागणार आहे.
@ पिक विमा कंपनीचा ro.mumbai@aiconfindia.com/pikvima@aicofindia.com हे मेल आयडी आहेत. यावरही तक्रार नोंदविता येणार आहे.
@ ज्या बॅंकेत शेतकऱ्यांनी आपला विमा भरलेला आहे त्या बॅंकेच्या शाखेतही शेतकऱ्यांना तक्रारीचा अर्ज करता येणार आहे.
दरम्यान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, शेत जमिन जलमय झाल्यास तसेच गारपीट, ढगफुटी शिवाय वीज कोसळून लागलेली आग या प्रसंगी शेतकऱ्यांना या सहा पर्यांयांचा उपयोग होणार आहे. नुकसानीची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आतमध्ये विमा कंपनीला याबाबतची सुचना देणे आवश्यक आहे. याकरिता वरील सहाही पर्याय हे खुले असणार आहे. नेमून दिलेल्या वेळेत तक्रार दाखल झाल्यास विमा कंपनीलाही योग्य ती कारवाई करता येणार आहे.