नागपूर दि.१३ – आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका या ओबीसी विरुद्ध ओबीसीच होतील. त्या ओबीसी विरुद्ध ओपन अशा होणार नाहीत. ओबीसी समाज आपल्या हक्कांबाबत प्रचंड जागृत झाला आहे. त्यामुळे सर्वच पक्षांना याच मार्गाने जावं लागेल. नाही तर त्यांना महागात पडेल, असा इशारा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला.
विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हे मोठं विधान केलं. ओबीसींच्या हक्काचं आरक्षण वगळून कुणालाही पुढे जायचं नाही. राज्यातील ओबीसी जागृत आहे. ओबीसींच्या जागेवर इतरांना उभं करणं सर्वच पक्षाला महागात पडणार आहे. त्यामुळे उद्या ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका लढवण्याची वेळ आली तर सर्वच पक्ष ओबीसींच्या आधीच्या आरक्षित जागेवर उमेदवार देणार आहेत. तसं सर्वच पक्षाने जाहीरही केलं आहे. आमच्या पक्षाचीही तीच भूमिका आहे. पुढील जिल्हा परिषदांमध्ये ओबीसी विरुद्ध ओबीसी अशीच निवडणूक होईल. ओबीसी विरुद्ध खुला वर्ग अशी निवडणूक होणार नाही. सगळ्यांना त्या प्रक्रियेतून जावं लागेल, ते करावंच लागेल. त्यातच त्यांचं भलं आहे. कारण राज्यातील ओबीसी जागृत आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.