बीड दि. १४ – मंत्री धनंजय मुंडेंविरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी परळीला आलेल्या आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली दाखल गुन्हयात न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्माच्या जामिन अर्जावर सुनावणीसाठी आजची (दि. १४) तारीख देण्यात आली आहे. मात्र ज्या न्यायालयासमोर ही सुनावणी होणार आहे त्या न्यायधीश रजेवर असल्याने इतर न्यायालयासमोर आज सुनावणी
होणार का पुढची तारीख मिळणार हे कोडे आहे. आज सुनावणी झाली नाही तर मात्र शर्मांचा कोठडीतील मुक्काम वाढू शकतो.
बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्याची घोषणा करत करुणा शर्मा परळीत आल्या होत्या. मात्र याठिकाणी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात त्यांना अटक झाल्याने त्या सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.करुणा शर्मा यांनी अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला असून त्यावर सुनावणीसाठी मंगळवार (दि.१४) ची तारीख देण्यात आली होती. मात्र ज्या अति. जिल्हा सत्र न्यायाधिश श्रीमती सापत्नीकर यांच्या न्यायालयात ही सुनावणी होणार आहे, त्या न्यायाधिश आज रजेवर आहेत. त्यामुळे आज दुसरे न्यायालय ही याचिका ऐकते का यात आणखी पुढची तारीख दिली जाते हा प्रश्नच आहे. मिळालेल्या माहितीनुसार न्या. श्रीमती सापत्नीकर १६ सप्टेंबर पर्यंत रजेवर आहेत. दुसऱ्या न्यायालयाने ही याचिका आज ऐकली नाही तर आणि न्या. सापत्नीकर यांच्यासमोरच सुनावणी होणार असेल तर ती १७ सप्टेंबर नंतरच अपेक्षित आहे.