Site icon सक्रिय न्यूज

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावास व 1500/- रु दंड

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावास व 1500/- रु दंड
बीड दि.१४ – एका अल्पवयीन मुलीस शाळेत जात असताना अडवून सतत बोलण्याचा प्रयत्न करून व तू मला साथ दिली नाहीस तर आईवडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकास तीन वर्षे सश्रम कारावास व दीड हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, बीड एस. एस. महाजन यांनी ठोठावली आहे.
सदर प्रकरणातील आरोपी आरुण छबु पुलावले, वय-18, रा. देवीगव्हाण, ता.आष्टी जि. बीड याने अल्पवयीन पिडीत मुलगी ही शाळेत जातांना तीस वेळोवेळी अडवून बोलण्याचा प्रत्यन केला व दिनांक 09/03/2018 रोजी ती हापस्यावर पाणी भरत असतांना तिचा विनयभंग करून तू मला साथ दिली नाहीस तर तुझ्या आई-वडीलांना जिवे मारून टाकील अशी धमकी दिली. सदर प्रकरणी पिडीतेच्या वडीलांनी पोलीस ठाणे आष्टी अंतर्गत गु.र.नं.58/2019 कलम 354(अ), 354(ड) 341,506 भादंवि सह कलम 8, 12 बालकांचे लैंगीक अत्याचारापसून संरक्षण अधिनीयम अन्वये फिर्याद दिली होती. प्रकरणाचा तपास सपोनि व्ही. व्ही. शहाने यांनी करून आरोपीताविरूध्द दिसून येत असलेल्या सबळ पुराव्याच्या आधारावर अंतीम दोषारोप पत्र मा. न्यायालयास सादर केले.
             सदर प्रकरणाची सुनावणी मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, बीड श्री एस. एस. महाजन यांच्या न्यायालयात होऊन दिनांक 14/09/2021 रोजी अंतीम न्यायनिर्णय पारीत करण्यात आला आहे. पारीत न्यायनिर्णयान्वये आरोपीतास कलम 354(अ), 354(ड), 341,506 भादंवि सह कलम 8,12 बालकांचे लैंगीक अत्याचारापसून संरक्षण अधिनीयम अंतर्गत दोषी ठरविण्यात आले आहे. आरोपीस कलम 8 बालकांचे लैंगीक अत्याचारापासून संरक्षण अधिनयम अंतर्गत तीन वर्ष सश्रम कारावास व 500/- रु. दंड, दंड न भरल्यास एक महिना अतिरीक्त सश्रम कारावास तसेच कलम 12 बालकांचे लैंगीक अत्याचारापासून संरक्षण अधिनयम अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास व 500/- रु. दंड, दंड न भरल्यास सात दिवस अतिरीक्त सश्रम कारावास आणि कलम 506 भादंवि अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास व 500/- रु. दंड, दंड न भरल्यास सात दिवस अतिरीक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. आरोपीतास सर्व शिक्षा एकत्रीत भोगावयाच्या आहेत.
                 सदर प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू सरकारी अभियोक्ता आर. बी. बिरंगळ यांनी मांडली तर पैरवीचे कामकाज सफौ / 1965 सी. एस. इंगळे यांनी पाहिले.
शेअर करा
Exit mobile version