केज दि.१७ – दोन दिवसांपूर्वी माहेरी आलेल्या शिक्षिकेचा मृतदेह तिच्या दीड वर्षांच्या चिमुकलीसह विहिरीत आढळून आला असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. परंतु माय-लेकीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बाणेगाव (ता.केज) येथे घडलेल्या घटनेतील आशा सुंदर जाधवर (२२) व शांभवी सुंदर जाधवर (१८ महिने) अशी त्या माय-लेकीची नावे आहेत.
एकमेकीला बिलगलेल्या अवस्थेत असलेले मायलेकींचे मृतदेह काढले पाण्याबाहेर…..!
आशा यांचे बाणेगाव हे माहेर असून त्यांचा विवाह सुंदर जाधवर (रा.वडजी ता.वाशी जि.उस्मानबााद) यांच्याशी तीन वर्षांपूर्वी झाला होता. आशा व सुंदर हे दोघेही शिक्षक होते. ते पुण्यात वास्तव्यास होते. वर्षभरापूर्वी सुंदर यांना कोरोनाची लागण झाली, यातच उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. पतीच्या जाण्याने आशा विरहात होत्या. दोन दिवसांपूर्वी त्या मुलगी शांभवीसह माहेरी बाणेगावला आल्या होत्या. १६ सप्टेंबर रोजी वडील बाहेरगावी गेले होते तर आई शेतीकामात व्यस्त होती. दुपारी ४ वाजता मुलगी शांभवीला कडेवर घेऊन आशा शेतात गेल्या. यावेळी खेळता – खेळता मुलगी विहिरीजवळ गेली. तिचा तोल गेल्याने धावत जाऊन आशा यांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघींचाही बुडुून मृत्यू झाला.
केज ठाण्याचे सहायक निरीक्षक शंकर वाघमोडे, उपनिरीक्षक दादासाहेब सिध्दे, जमादार जसवंत शेप, रशीद शेख यांनी धाव घेत १६ रोजी रात्री उशिरा मायलेकीचे मृतदेह नांदूरघाट ग्रामीण रुग्णालयात पाठविले. १७ रोजी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले तर सकाळी ११ वाजता मायलेकीवर एकाच चितेवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. कुटुंंबीयांच्या आक्रोशाने उपस्थितांनाही हुंदके आवरता आले नाहीत. नातेवाईकांचे जवाब बाकी असून अधिक तपास सुरु असल्याचे सहायक निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी सांगितले.