बीड दि.21 – पोलीस अधीक्षक, बीड या घटकाच्या आस्थापनेवरील चालक पोलीस शिपाई भरती-2019 परीक्षा दि.22 सप्टेंबर रोजी होणार असून या बाबत उमेदवारांना कांही सूचना देण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षक, बीड यांचे आस्थापनेवरील रिक्त असलेल्या चालक पोलीस शिपाई ( 36 ) पदांची भरती करणेसाठी दिनांक 30/11/2019 रोजी जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर परीक्षा ही दिनांक 22-09-2021 रोजी घेण्याचे निश्चित केले आहे. बीड घटकात आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचे प्रवेशपत्र (Admit Card) हे https://aurangabadrangebharti.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांनी नमुद संकेतस्थळावरून आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे. उमेदवारांनी परिक्षेला येतांना प्रवेशपत्र (Admit Card) सोबत घेवून येणे अनिवार्य आहे. तसेच उमेदवारांनी खालील सुचनांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.
तसेच परीक्षा ही दि. 22-09-2021 रोजी 11:00 वा. ते 12:30 वा. पर्यंत घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर उमेदवारांना 09:00 वा. ते 10:30 वा. पर्यंत प्रवेश दिला जाईल. 10:30 वा. नंतर कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी वरील संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट केलेले मुळ स्वरूपातील प्रवेशपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. उमेदवारांची तपासणी/झडती, थर्मो गनच्या सहाय्याने उमेदवारांच्या शारिरीक तापमानाची तपासणी प्रवेशद्वारावर करण्यात येईल. उमेदवारांनी मास्क सोबत घेवून येणे. ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड (ई-आधारकार्डला मान्यता नाही), निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन यापैकी किमान कोणतेही एक मुळ ओळखपत्र तसेच उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी मुळ ओळखपत्राची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी स्वतंत्रपणे सादर करणे अनिवार्य आहे. अन्यथा प्रवेश नाकारण्यात येईल. परीक्षा केंद्रामध्ये फक्त संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेशपत्र, काळा/निळा बॉल पॉईंट पेन, मुळ वैध ओळखपत्र, मास्क एवढेच साहित्य घेवून जाण्यास परवानगी आहे. परवानगी नसलेले अन्य कोणतेही साहित्य सोबत बाळगल्यास ते सुचनांचे उल्लंघन समजून कारवाई करण्यात येईल. सोबत आणलेले साहित्य परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर ठेवल्यास व ते गहाळ झाल्यास त्याची जबाबदारी या कार्यालयाची राहणार नाही.
तर परीक्षा सुरू झाल्यानंतर ती संपेपर्यंत व सर्व उत्तर पत्रिका (OMR Sheet) जमा होईपर्यंत कोणत्याही उमेदवारास परीक्षा केंद्राच्या बाहेर जाता येणार नाही. कोव्हिड-19 विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या सर्व सुचनांचे / आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे. जे उमेदवार लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतील त्यांची शारिरीक पात्रता तपासण्यापुर्वी सर्व मुळ कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल अश्या सूचना उमेदवारांना देण्यात आल्या आहेत.