केज दि.२२ – आमच्या भांडणात का पडतात असे म्हणत भावजयीने दिराच्या अंगावर चटणी फेकून काठीने डोक्यात मारत डोके फोडले. तर भावाने ही पाठीत लाथाबुक्याने मारहाण केल्याची घटना केज तालुक्यातील टाकळी येथे घडली. याप्रकरणी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
टाकळी येथील मधुकर शिवाजी घुले ( वय ३५ ) हे २१ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घराबाहेर आले असता त्यांची भावजयी मनीषा इंद्रजित घुले व त्यांचा भाऊ इंद्रजित शिवाजी घुले हे दोघे आले. त्यांनी काल आम्ही धनराजला मारत असताना तुम्ही मध्ये का आलात अशी विचारणा केली असता मधुकर घुले यांनी तुम्ही जवळचे आहात, घरात भांडण चांगले नाही असे म्हणताच मनीषा घुले यांनी त्यांच्या अंगावर चटणी फेकत काठी उचलून त्यांच्या डोक्यात मारल्याने डोके फुटले. त्यांचा भाऊ इंद्रजित याने त्यांच्या पाठीत लाथाबुक्याने मारहाण करीत मुक्कामार दिला. त्यांची आई कौशल्या ह्या भांडण सोडविण्यास आल्या असता त्यांच्या ही मनगटावर काठी मारून पुन्हा आमच्या भांडणात आलात तर जीवे मारू अशी धमकी दिली. मधुकर घुले यांच्या फिर्यादीवरून मनीषा घुले, इंद्रजित घुले या दोघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.