बीड दि.२३ – मित्राचा वाढदिवस साजरा करायचा आहे. तू रस्त्यावर ये, असे असे म्हणत बोलावून नाकलगावच्या 19 वर्षीय युवकाला मारहाण करून धारूर घाटात नेले, यानंतर त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना गुरुवार दि. 22 रोजी पहाटे घडली असून या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
कृष्णा अर्जुन गायकवाड (वय 19 वर्षे रा. नाकलगाव) हा बुधवार दि. 21 रोजी रात्री साडेआठ वाजता आपल्या गावातील किराणा दुकाना समोर थांबला होता. त्यावेळी त्याचा मित्र आदिनाथ सुधाकर गायकवाड याचा फोन आला व आपल्याला मित्राचा वाढदिवस करायचा आहे, तू रस्त्यावर ये असे म्हणाला. यानंतर कृष्णा आदिनाथच्या बोलण्यावरून वाढदिवस साजरा करण्यासाठी रस्त्यावर गेला. त्यावेळी आदिनाथ व त्याच्या सोबत असणाऱ्या इतर 4 जणांनी कृष्णाला शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच पोत्यात टाकून चारचाकी वाहनातुन सोन्निमोहा ते धारूर घाटाच्या परिसरात गाडीतून फेकून दिले. तसेच त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत मारण्याच्या उद्देशाने पेटवून देऊन आरोपी निघून गेले. परंतु काही वेळाने बेशुद्ध अवस्थेत असलेल्या कृष्णाला जवळील वस्तीवरच्या लोकांनी आपल्या वस्तीवर आणून कृष्णाच्या नातेवाईकांना फोन करून सदरील घटनेची माहिती दिली.
दरम्यान कृष्णावर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कृष्णाचे चुलते भीमराव निवृत्ती गायकवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपी आदिनाथ सुधाकर गायकवाड व इतर तीन अनोळखी व्यक्ती विरोधात दिंद्रुड पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपी फरार आहेत. प्रकरणाचा पुढील तपास स.पो.नि. प्रभा पुंडगे या करत आहेत.