केज दि.२५ – मागच्या दोन महिन्यापूर्वी केजच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले होते. मात्र मध्यंतरी जरा मोबाईल चोरीचे प्रकार कमी झालेले असताना पुन्हा बाजार करीत असताना एका शाखा अभियंत्यांच्या शर्टच्या खिशातून अज्ञात चोरट्याने १३ हजार ५०० रुपये किंमतीचा मोबाईल चोरल्याची घटना केज शहरात घडली. याप्रकरणी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
केज शहरातील फुले नगर भागात वास्तव्यास असलेले भाऊसाहेब सीताराम एडके हे अंबाजोगाई येथील जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे कार्यालयात शाखा अभियंता पदावर कार्यरत आहेत. शुक्रवारी ( दि. २४ ) दुपारी एडके हे शहरातील आठवडी बाजारात भाजीपाला खरेदीसाठी गेले होते. भाजीपाला घेत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या शर्टच्या खिशातील १३ हजार ५०० रुपये किंमतीचा सॅमसंग – ए १२ कंपनीचा मोबाईल काढून घेत पोबारा केला. भाऊसाहेब एडके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक अनिल मंदे पुढील तपास करत आहेत.