केज दि.26 – तालुक्यातील मस्साजोग ते बोरगाव दरम्यान असलेल्या आरणगाव गावाशेजरी असणाऱ्या बोभाटी नदीवरील पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने मागच्या तीन दिवसांपासून सदरील मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे.
मागच्या चार पाच दिवसांपासून केज तालुक्यातील सर्वच मंडळात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तालुक्यातील सर्वच पाण्याचे स्रोत भरले आहेत. तसेच तालुक्यातील सांगवी सारणी येथील तलाव ओव्हरफ्लो झाल्याने सांडव्यातून मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे बोभाटी नदी दुथडी भरून वाहत असल्याने लहान मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत.
अरणगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने मस्साजोग ते बोरगाव हा मार्ग पुर्णतः बंद आहे.सदरील मार्गावरील अनेक गावच्या लोकांना इतर वेगवेगळ्या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. तसेच केळगाव बेलगाव दरम्यान असलेला पुलही पाण्याच्या प्रवाहामुळे खचला आहे.
दरम्यान, सदरील घटनेची माहिती मिळताच केजचे तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी सदरील भागाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असून जि. प.बांधकाम विभागाच्या केळगाव बेलगाव पुलाची पाहणी करून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.