केज दि.26 – मागील आठ दिवसापासून केज तालुक्यात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे मांजरा पट्ट्यासह उंदरी नदीला पूर
आल्याने मोठे नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी मांजरा विकास परिषदेच्या वतीने प्रवीण खोडसे यांनी केली आहे.
जिल्ह्यात चांगल्या प्रकारचा पाऊस झाल्याने तीन जिल्ह्यांची तहान भागवणारे मांजरा धरण सलग दुसऱ्या वर्षी 100% भरले पण अतिरिक्त पाऊस पडल्यामुळे मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडावे लागले आहेत.
त्यामुळे धरणाच्या खालच्या भागातील शेतात पाणी गेल्याने शेतांचे नुकसान होऊन हातात आलेले पीक शेतकऱ्यांना गमवावे लागत आहे. त्याचबरोबर अति पावसामुळे उंदरी नदीला पूर येऊन शेजारच्या शेतात देखील पाणी जाऊन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर उंदरी नदीवरील नायगाव सौंदना या दोन गावांना जोडणारा पूल पुराच्या पाण्याने खचून जाऊन पुलाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे चारचाकी वाहनांना जाण्या येण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. जीव मुठीत धरून पुलावरून जावे लागत आहे. तसेच मांजरा नदीवरील सौंदना येथील बंधाऱ्याचे दरवाजे पुराच्या प्रवाहाने तुटून गेले आहेत.
त्या सर्व बाबींची प्रशासनाने तात्काळ नोंद घेऊन शेतीपिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यासह नायगाव सौंदना रोडवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम तात्काळ मार्गी लावावे अशी मागणी मांजरा विकास परिषदेचे अध्यक्ष प्रवीण खोडसे, अमोल गोरे, ऍड. राघवेंद्र भिसे, भगवन्त मोरे यांनी केली आहे.