केज दि.२६ – केज पोलिसांनी बरड फाट्यावर छापा मारून ८ हजार ६४० रुपये किंमतीच्या देशी दारूच्या २८८ बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज – मांजरसुंबा रस्त्यावरील बरड फाट्यावर दहिफळ ( वडमाऊली ) रस्त्याच्या बाजूला मोकळ्या पटांगणात एक तरुण देशी दारूची विक्री करीत असल्याच्या गुप्त महितीवरून केज ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनात नांदूरघाट चौकीचे जमादार गोविंद बडे, जसवंत शेप, पोलीस नाईक रशीद शेख यांच्या पथकाने रविवारी सकाळी १० वाजता छापा मारला. यावेळी शाबाज मोहसीन सय्यद ( रा. अजिज पुरा, केज ) हा तरुण देशी दारूची विनापरवाना व बेकायदेशीरपणे विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी ८ हजार ६४० रुपये किंमतीची बॉबी संत्रा कंपनीच्या देशी दारूच्या २८८ बाटल्या जप्त केल्या. जमादार गोविंद बडे यांच्या फिर्यादीवरून शाबाज सय्यद याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा करण्यात आला आहे. जमादार जसवंत शेप हे पुढील तपास करत आहेत.