केज दि.३ – शेतातून ट्रॅक्टर का फिरविले व उसाचे पाचट शेतात आले या किरकोळ कारणावरून दोन गटात दगडाने झालेल्या हाणामारीत एका महिलेसह दोघांचे डोके फुटले असून एकाच्या पायाला जखम झाल्याची घटना बनकारंजा ( ता. केज ) येथे घडली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात आठ जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
बनकारंजा येथील निर्मला जनक नागरगोजे ( वय ४० ) व त्यांचे पती जनक विठोबा नागरगोजे हे दोघे २ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शिवारातील गायमाळ शेतात असताना त्यांचे शेजारी चंद्रसेन रामधन लांब, बबलू चंद्रसेन लांब, समाधान चंद्रसेन लांब, समाधान विठोबा लांब या चौघांनी आमच्या शेतातून ट्रॅक्टर का फिरविले असावं म्हणत शिवीगाळ करीत निर्मला यांच्या डोक्यात दगड मारून डोके फोडले. तर जनक यांचे डाव्या पायावर दगड मारून दुखापत करीत जीवे मारण्याची धमकी दिली.
दुसऱ्या गटाचे समाधान विठोबा लांब हे त्यांच्या शेतात आलेले उसाचे पाचट काढून घ्या अथवा जाळून टाका म्हणाले असता जनक विठोबा नागरगोजे, निर्मला जनक नागरगोजे, विलास जनक नागरगोजे, आश्विनी विलास नागरगोजे या चौघांनी तुला बघतोस असे म्हणत शिवीगाळ करीत लाथाबुक्याने मारहाण केली. तर जनक नागरगोजे याने डोक्यात दगड मारून डोके फोडत कानाला चावा घेऊन जखमी केले. जीवे मारण्याची धमकी ही दिली.
निर्मला नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून चंद्रसेन लांब, बबलू लांब, समाधान चंद्रसेन लांब, समाधान विठोबा लांब या चौघांविरुद्ध तर समाधान विठोबा लांब यांच्या फिर्यादीवरून जनक नागरगोजे, निर्मला नागरगोजे, विलास नागरगोजे, आश्विनी नागरगोजे या चौघांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. पुढील तपास पोलीस नाईक संपत शेंडगे हे करत आहेत.
केजमध्ये पाचशे रुपायांवरून दोघांत हाणामारी
पाचशे रुपायांवरून दोघांमध्ये लोखंडी गजाने व लाथाबुक्याने हाणामारी होऊन खिशातील दहा हजार रुपये काढून घेत संगणक फोडून नुकसान केल्याची घटना केज शहरात घडली. याप्रकरणी टाकळीच्या चौघांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
टाकळी येथील लक्ष्मण साहेबराव घुले हा २९ एप्रिल रोजी दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास गावातील बालाजी गोरख घुले याच्या केज शहरातील शुक्रवार पेठेत असलेल्या पवन कौशल्य ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन पाठविलेले पाचशे रुपये मागू लागला. त्यावर बालाजी घुले याने तुझे पैसे आले नाहीत, तुला काय करायचे ते कर म्हणत शिवीगाळ करीत लाथाबुक्याने मारहाण करून लक्ष्मण याच्या कानाजवळ डोक्यात लोखंडी गज मारून दुखापत केली.
दुसऱ्या गटाचे बालाजी गोरख घुले हे त्यांच्या ग्राहक सेवा केंद्रावर असताना लक्ष्मण घुले, रामेश्वर घुले, सिध्देश्वर घुले या तिघांनी येऊन तुझ्या खात्यावर आलेले पैसे आताच का देत नाहीस असे म्हणत बाळाजी घुले यांना लाथाबुक्याने मारहाण केली. रामेश्वर याने बालाजीच्या खिशातील दहा हजार रुपये काढून घेत दुकानातील संगणक फोडले. लक्ष्मण घुले यांच्या फिर्यादीवरून बालाजी घुले विरुद्ध तर बालाजी घुले याच्या फिर्यादीवरून लक्ष्मण घुले, रामेश्वर घुले, सिध्देश्वर घुले या तिघाविरुद्ध केज पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. सहाय्यक फौजदार महादेव घुले, पोलीस नाईक मंगेश भोले हे पुढील तपास करत आहेत.
तंबाखू न दिल्यावरून वृद्धास बेदम मारहाण
तंबाखू न दिल्याच्या कारणावरून एका ६३ वर्षीय वृद्ध नागरिकास एकाने चमड्याच्या चप्पलने तोंडावर, डोक्यात मारून जखमी केल्याची घटना जिवाचीवाडी ( ता. केज ) येथे घडली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
जिवाचीवाडी ( ता. केज ) येथील रावसाहेब किसन चौरे ( वय २३ ) हे १ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास शिवारातील रानुबाईच्या रोडवर असताना गावातील राजेसाहेब नरसिंग चौरे याने त्यांना तंबाखू खाण्यास मागितली. त्यांनी नाही म्हणताच राजेसाहेब याने पायातील चमड्याचे चप्पल काढून रावसाहेब यांच्या तोंडावर, ओठावर आणि डोक्यात मारून जखमी केले. जीवे मारण्याची धमकी ही दिली. रावसाहेब चौरे यांच्या फिर्यादीवरून राजेसाहेब चौरे याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस नाईक बाळू सोनवणे हे करत आहेत.