केज दि.५ – जुन्या भांडणाची कुरापत काढून दोघा बापलेकांनी एका ६५ वर्षीय वृद्ध नागरिकास दगडाने शरीरावर मारहाण करून जखमी करीत डोक्यात लोखंडी रॉड मारून डोके फोडल्याची घटना बनसारोळा ( ता. केज ) येथे घडली. या प्रकरणी युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
बनसारोळा येथील महादेव लक्ष्मण शिंदे ( वय ६५ ) हे गावातील महादेव धायगुडे यांच्या दुकानासमोरून २४ एप्रिल रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास जात होते. यावेळी महादेव धायगुडे व त्यांचा मुलगा दिनकर धायगुडे या दोघा बापलेकांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून त्यांना शिवीगाळ करीत दगडाने त्यांच्या शरीरावर बेदम मारहाण करीत जखमी केले. तर महादेव धायगुडे याने लोखंडी रॉड महादेव शिंदे यांच्या डोक्यात मारून डोके फोडले. गंभीर जखमी झालेल्या महादेव शिंदे यांनी उपचार घेऊन आल्यानंतर ४ मे रोजी दिलेल्या फिर्यादीवरून महादेव धायगुडे व त्यांचा मुलगा दिनकर धायगुडे या दोघा बापलेकांविरुद्ध युसुफवडगाव ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भगवान खेडकर हे करीत आहेत.