Site icon सक्रिय न्यूज

अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी केजमधूनही उठाव…..!

केज दि.७ – मागच्या कित्येक वर्षांपासून आंबेजोगाई जिल्हा निर्मिती करण्यासाठी अनेकदा आंदोलने झाली. कित्येक वेळेस रीतसर निवेदने देण्यात आली. आंबेजोगाई जिल्हा निर्मितीची सातत्याने मागणी होत असताना अद्यापही त्यावर कसल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही. मात्र आता आंबेजोगाईकर आरपारची लढाई लढण्यास तयार असून ऑगस्ट क्रांती दिनी मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन उभारण्याची तयारी आंबेजोगाई करांनी केलेली आहे. आणि त्यातच भर म्हणून केज तालुक्यातूनही आंबेजोगाई जिल्हा निर्मितीसाठी आंदोलनाचे इशारे देण्यात येत आहेत.

               सांस्कृतिक शहर म्हणून आंबेजोगाई ची एक स्वतंत्र ओळख आहे. आशिया खंडातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे ग्रामीण रुग्णालय हे आंबेजोगाई शहरात आहे. त्याचबरोबर योगेश्वरी देवीचे मंदिरही आंबेजोगाई शहरात असून संपूर्ण महाराष्ट्रातून योगेश्वरी च्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे आंबेजोगाई शहराला एक आगळे वेगळे स्थान प्राप्त झालेले आहे. आंबेजोगाई शहराचा विस्तार ही मोठ्या प्रमाणावर झाला असून आंबेजोगाई शहराला शैक्षणिक वारसाही सर्वश्रुत असून वैद्यकीय महाविद्यालयाबरोबर इतर शैक्षणिक महाविद्यालय ही मोठ्या प्रमाणावर आहेत. शांत, संयमी आणि सांस्कृतिक शहर म्हणून आंबेजोगाई ची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आणि म्हणूनच आंबेजोगाई जिल्हा करण्यात यावा अशी सातत्याने मागणी होत आहे. एवढेच नव्हे तर बीड जिल्ह्यामध्ये आंबेजोगाई आणि परळी चा समावेश आहे. आंबेजोगाई आणि परळी हे अगदी टोकाला असलेले तालुके आहेत. आंबेजोगाईहून बीडला जर जायचे असेल तर सुमारे शंभर किलोमीटर आणि परळीहून बीडला जायचे असेल तर 120 किलोमीटरचा पल्ला गाठावा लागतो. त्यामुळे अनेकदा जिल्हा कार्यालयामध्ये जाण्यासाठी आंबेजोगाई आणि परळी तालुक्यातील नागरिकांना वेळ आणि श्रम मोठ्या प्रमाणावर खर्च करावे लागतात. त्यामुळे आंबेजोगाई जिल्हा होणे ही काळाची गरज आहे. आणि म्हणूनच आंबेजोगाईची जिल्हा निर्मिती व्हावी यासाठी मागच्या कित्येक वर्षांपासून सातत्याने मागणी होत आहे. अनेकदा आश्वासनेही दिली. परंतु जिल्हा निर्मितीची घोषणा काही झाली नाही. मात्र आता आंबेजोगाईकरांनी मोठ्या प्रमाणावर उठाव घेतला असून आंबेजोगाई जिल्हा निर्मितीची मागणी लावून धरलेली आहे.आणि याचाच एक भाग म्हणून ऑगस्ट क्रांती दिन मोठे आंदोलन उभारण्याची तयारी आंबेजोगाई तालुक्यात होत आहे.
                     एवढेच नव्हे तर केज तालुक्यातून ही आता आंबेजोगाई जिल्हा निर्मिती व्हावी यासाठी मागणी होऊ लागलेली आहे आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी आंबेजोगाई जिल्ह्याची निर्मिती करावी अशी मागणी केज तालुक्यातील होऊ लागलेली आहे. आणि अशा आशयाचे निवेदन केजचे तहसीलदार यांना देण्यात आलेले आहे.अन्यथा लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. सदरील निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे राहुल खोडसे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शेअर करा
Exit mobile version