Site icon सक्रिय न्यूज

शेतकऱ्यांनो उसाचे पाचट जाळू नका…..! 

माळेगाव दि.४ – (बळीराम लोकरे) – केज तालुक्यात सध्या ऊस तोडणी हंगाम सुरू आहे. ऊस गाळपाला गेल्यानंतर शिल्लक राहिलेले पाचटीची आंतर मशागत करताना अडचण येते म्हणून शेतकरी ते जाळून टाकतात. याचे अनेक दुष्परिणाम जमिनीवर होतात.परंतु शेतकऱ्यांनी शेतातील पाचट जाळून न टाकता त्याची कुटी करून जमिनीत कुजविणे फायदेशीर असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
                उसाची तोडणी झाल्यानंतर  मोठ्या प्रमाणावर पाचट शिल्लक राहते. बहुतांश शेतकरी ते पाचट जाळून टाकतात. परिणामी जमिनीतील असंख्य जिवाणूंचा नाश होतो आणि जमिनीचे आरोग्य देखील बिघडते. पाचट न जाळता पाचट कुटी करून ते जमीनींत कुजवण्याचे नियोजन  केल्यास जमिनीचे तापमान नियंत्रित ठेवता येते.ओलावा टिकून राहतो. पाचट जमिनीत कुजल्यानंतर जमिनीतील मातीच्या कणाची रचना सुधारून जमीन भुसभुशीत होते.यामुळे जिवाणूंच्या संख्येत वाढ होते.तसेच जमिनीतील नत्र स्थिरीकरणाचे, स्फुरद व पालाश उपलब्धतेचे प्रमाण वाढून पिकांस अन्नघटकांचा पुरवठा होत असल्यामुळे उत्पादनात वाढ होते. त्याशिवाय रासायनिक खते २५ ते ३० टक्के कमी द्यावी लागतात.
  “उसाचे पाचट जाळल्याने जमिनीचे नुकसान होते. तसेच लाभदायक जिवाणू नष्ट होतात.हवा प्रदूषण पण वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाचट न जाळता पाचट कुटी करून जमिनीत कुजविल्यास जमिनीचा पोत सुधारतो तसेच सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होऊन पिकांना आवश्यक अन्नघटक उपलब्ध होतात.तसेच जमिनीची सुपीकता वाढून उत्पादन वाढण्यास मदत होते.त्यामूळे शेतकऱ्यांनी पाचट न जाळता पाचट  व्यवस्थापन करणे फायदेशीर आहे.”
              सागर पठाडे
  तालुका कृषी अधिकारी केज.

शेअर करा
Exit mobile version