बीड दि.१६ – सध्या दिवाळीमध्ये प्रत्येकाच्या घरी दिव्यांची रोषणाई सुरू आहे. विद्युत दिवे झगमगाटाने लुकलुकत आहेत. देश स्वतंत्र होऊन ७४ वर्षे झाली आहेत. प्रत्येक क्षेत्रात प्रचंड विकास झाला आहे.मात्र अजूनही कित्येक वाड्या-वस्त्यांवर लाईट पोहोचलेली नाही. आणि असेच एक अंधारात चाचपडणारे गाव केज तालुक्यातील काशीदवाडी हे आहे.
डोंगरात वसलेले खेडेगाव, गावात ३ ते ४ वस्त्या आहेत. काही वस्त्यांवर लाईट पोहोचलेली आहे तर काही ठिकाणी अजून पोहोचलेली नाही. घरी लाईट नसल्याने अडचणी चा डोंगर समोर उभा राहतो. स्वयंपाक करणे, मोबाईल चार्ज करणे, इत्यादी महत्त्वाची कामे खोळंबली जातात. संध्याकाळी अंधारात साप, विंचू, रानडुकर यांचाही त्रास असतो व जीव मुठीत धरून जगावे लागते. सध्या घरी रात्रीच्या उजेडासाठी बॅटरी वापरल्या जाते. तसेच फवारणी पंप हि वापरला जातो. मोबाईल चार्ज करण्यासाठी संध्याकाळी दररोज १ किमी चालत गावात जावे लागते. दोन दिवसाला बॅटरी चार्ज करावे लागतात व सात दिवसाला एकदा फवारा चार्ज करुन आणावा लागतो, हा सगळा खटाटोप केला तर रात्री थोडाफार उजेड पडतो. दळण आणण्यासाठी महिलांना गावात जावे लागते. इस्त्री, फॅन, कुलर, टीव्ही या सगळ्या गोष्टी तर स्वप्नातच आहेत.
गेली कित्येक वर्षे झाली डीपी बसून लाईट आज येईल उद्या येईल या आशेवर लोक बसले आहेत. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या कडून फक्त आश्वासनावरच बोळवण होत आहे. सर्वे करणे व इतर कारणासाठी महावितरणल पैसेही दिलेले आहेत मात्र ते तिकडेच गायब आहेत. घरी लाईट नाही याबद्दल ऊर्जा मंत्री यांच्या स्वीय सहाय्यक यांनाही फोन केलेला आहे पण अजून प्रतिसाद भेटलेला नाही. गेल्या महिन्यात कोटेशन भरले आहे पण लाईट फिक्स कधी येईल हे मात्र महावितरण वाल्यांनी सांगितलेले नाही. टेंडर निघणे व इतर शासनाच्या प्रक्रियेला खूप वेळ लागतो असे सांगण्यात आले.
कधीतरी लाईट आमच्या घरात येईल या आशेवर आम्ही जगत आहोत अशी भाबडी आशा लोक बाळगून आहेत.
——————————————
शेतीत भागत नाही म्हणून मी कामानिमित्त बाहेर जिल्ह्यात असतो. लाईट व रस्ता नसल्याने कुटुंबाची प्रचंड गैरसोय आहे. अजूनही माझ्या घरी लाईट नाही याबद्दल खूप त्रास होतो. लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी लक्ष द्यावे ही अपेक्षा.
– अशोक दत्तात्रय कदम