बीड दि.31 – गेवराई शहरातील साठे नगरमधील एका वयोवृद्ध महिलेला ‘तुमच्या खात्यावर १५ हजार रुपये आले आहेत.त्यासाठी तुम्हाला आधी एका लाखाचे सोने साहेबांना दाखवावे लागेल आणि सोबत बँक पासबुक आणि आधार कार्डची झेरॉक्स गरजेची आहे’ असं सांगून त्या महिलेचे दागिने ताब्यात घेत नंतर तिला झेरॉक्सला पाठवून एका ठगाने दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना गेवराई शहरातील तहसिल कार्यालयाजवळ बुधवारी (दि.३०) घडली आहे.
सुक्रानी जिलानी पठाण (वय-५० वर्ष रा.साठेनगर) असे त्या महिलेचे नाव असून त्या आपल्या आपल्या नातवाला सरकारी दवाखन्यात सुनासोबत घेऊन आल्या असता एका इसमाने त्यांना मी तुमच्या मुलाचा मित्र आहे.मी अनेकांच्या पगाराची कामे करून दिले आहेत.तुमच्या खात्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ हजार रुपये टाकले आहेत.ते काढण्यासाठी फक्त लाखाचे सोने तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.साहेबांना हे सोने दाखवयाचे सोबत बँक पासबुक आणि आधार कार्डची झेरॉक्स द्यायची आणि १५ हजार घ्यायचे असे बतावणी करून त्या महिलेला तहसील कार्यालयाजवळ घेऊन गेल्यानंतर त्या इसमाने महिलेचे सोने स्वतःच्या ताब्यात घेत तिला झेरॉक्स काढण्यासाठी पाठविले, आणि याच संधीचा फायदा घेत तेथून पळ काढला.दरम्यान झेराक्स काढून परतल्यानंतर सुक्रानी पठाण यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी गेवराई पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेला गंडविणारा तहसील परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.