बीड दि.५ – शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील बारावी आणि दहावीच्या परीक्षा अनुक्रमे २३ एप्रिल आणि २९ एप्रिलपासून होणार आहेत. दरवर्षी फेब्रुवारी- मार्चमध्ये होणाऱ्या या परीक्षा यंदा एप्रिल- मे महिन्यात होत आहेत. राज्यभर एप्रिल- मे महिन्यात कडक उन्हाळा असतो. त्यामुळे पेपरच्या वेळा बदलण्याची मागणी शिक्षक भारती संघटनेने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कडक उन्हाळा आणि राज्यातील अनेक भागातील वाढत्या तापमानाची परिस्थिती लक्षात घेऊन बारावी व दहावीच्या वार्षिक परीक्षा सकाळी लवकर म्हणजे सकाळी ८ वाजता सुरू करण्याबाबत नियोजन करावे, असेही सांगण्यात आले.
निवेदनावर माध्यमिक शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष अनिल देशमुख, अमरसिंग चंदेल, गणेश राठोड, विकास तावरे, विश्वास शेळके, ईश्वर खेडकर, सिद्धार्थ घुगे, भाऊसाहेब घोलप, श्याम खोसरे, परमेश्वर क्षीरसागर, दिलीप गायकवाड, संदीप तुंबारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.