केज दि.९ – मोबाईलवर ठेवलेल्या स्टेट्सवरून दोन गटात काठी, दगडाने हाणामारी झाली. यामध्ये एका महिलेसह दोघे जखमी झाल्याची घटना केज तालुक्यातील जाधवजवळा येथे घडली. याप्रकरणी केज पोलिसात आठ जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
जाधवजवळा येथील मनोहर गौतम जावळे यांना तुझ्या भावाने मोबाईलमध्ये आम्हाला उद्देशुन स्टेट्स का ठेवले असे म्हणत अभिजीत विठ्ठल जावळे याने त्यांच्या भावास खाली पाडले. तर विठ्ठल नारायण जावळे, उत्रेश्वर नारायण जावळे या दोघांनी काठीने व दगडाने मारहाण करीत डोके फोडले. मनोहर जावळे यांची आई भांडण सोडविण्यासाठी आली असता तिला पण शिवीगाळ करुन लाथाबुक्कयाने मारहाण केली. त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. तर दुसऱ्या गटाचे उत्रेश्वर नारायण जावळे यांना मोबाईलवर राजकारणाचे स्टेटस ठेवण्याच्या कारणावरून ते अपंग असताना शिवीगाळ करीत भिमा सुनिल जावळे, अजय गौतम जावळे, मनोहर गौतम जावळे, रोहीत बन्सी जावळे, रोहन डिगांबर जावळे यांनी लाथाबुक्कयाने मारहाण करुन काठीने व दगडाने मारुन दुखापत केली. जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. मनोहर जावळे यांच्या फिर्यादीवरून अभिजीत जावळे, विठ्ठल जावळे, उत्रेश्वर जावळे यांच्याविरुद्ध तर उत्रेश्वर जावळे यांच्या फिर्यादीवरून भिमा जावळे, अजय जावळे, मनोहर जावळे, रोहीत जावळे, रोहन जावळे यांच्याविरुद्ध केज पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. जमादार दिनकर पुरी व पोलीस नाईक धनपाल लोखंडे हे पुढील तपास करत आहेत.