बीड दि.1 – लोकपत्र दैनिकाचे संपादक रविंद्र तहकीक यांनी आपल्या अग्रलेखातून समस्त शिक्षकांच्या भावना दुखावतील असे अवमानकारक लिखाण केल्याबद्दल केज तालुका शिक्षक समन्वय समितीच्या वतीने केज (जि. बीड) पोलिसांत तक्रार दिली असून तहकीक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मागच्या सहा महिन्यांपूर्वी ही संपादक तहकीक यांनी शिक्षकांना मास्तरड्यानो, कामचुकार, पार्श्वभाग दुखतो का ? अश्या शब्दांचा वापर करून समस्त शिक्षकांचा अवमान केला होता. आणि मागच्या चार दिवसांपूर्वी ही असाच अवमानकारक पूर्वग्रहदूषित मजकूर छापून शिक्षकांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
वास्तविक पाहता मागच्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या संकटात शिक्षकांनी पोलीस, आरोग्य विभागाच्या खांद्याला खांदा लावून ऑनलाइन शिक्षणाबरोबर चेकपोस्ट, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, लसीकरण, किराणा सामानाचे वितरण, झिरो डेथ मिशन इत्यादी कामे चोख पार पाडली आहेत व आणखीही ती सुरू आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांना कर्तव्य पार पाडताना कोरोनाची लागण झाली व यामध्ये शेकडो शिक्षकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तर कित्येक शिक्षक कर्मचाऱ्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहेत.असे असूनही हे संपादक महाशय शिक्षकांच्या कामाची दखल न घेता वारंवार त्यांचा अवमान करत आहेत. एवढेच नव्हे तर जे शिक्षक कर्तव्य पार पाडताना मृत्युमुखी पडले आहेत त्यांचा व त्यांच्या कुटुंबाचाही त्यांनी अवमान केला आहे.
त्यामुळे सदरील संपादकाचा निषेध करण्यासाठी व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी केज तालुका शिक्षक समन्वय समितीने कोरोना विषयक नियम पाळत एका छोटेखानी मीटिंग चे आयोजन केले होते. यावेळी संपादक रविंद्र तहकीक यांचा निषेध करून केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्याकडे लेखी तक्रार करून तहकीक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावेळी समन्वय समितीचे बी.टी. सारूक, यु.एल.थोरात,ए. एन. पवार,रामदास वडणे, दत्तात्रय अंधारे,विवेकानंद वाघ,राहुल काकनाळे, चंद्रकांत यादव, बिभीषण मोहिते, आ. अ. सोनवणे यांची उपस्थिती होती.