Site icon सक्रिय न्यूज

युवकांना सैन्य दलात भरती होण्याची संधी…..!

युवकांना सैन्य दलात भरती होण्याची संधी…..!

 दिल्ली दि.१६ – भारतामध्ये युवकांना सैन्य दलात भरती होण्याचं आकर्षण मोठ्या प्रमाणावर आहे. नॅशनल कॅडेट कोर म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेना प्रमाणपत्र असणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. इंडियन आर्मीमध्ये शॉर्ट सर्विस कमिशन अंतर्गत एनसीसी स्पेशल एंट्री स्कीममध्ये भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. महिला आणि पुरुष उमदेवारांना अर्ज करता येणार आहे. एनसीसी प्रमाणपत्र आणि पदवीधारक उमेदवार अर्ज करु शकतात.

इंडियन आर्मीच्या वेबसाईटवर एनसीसी स्पेशल एंट्री स्कीममध्ये अर्ज करण्यास 16 जूनपासून सुरुवात झाली आहे. अर्ज करणारे उमेदवार इंडियन आर्मीच्या वेबसाईटवर म्हणजेच joinindianarmy.nic.in ला भेट देऊन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अखेरची मुदत 15 जुलै आहे. हे अर्ज दाखल करण्यासाठी कसलंही शुल्क जमा करावं लागणार नाही. केंद्रीय वेतनश्रेणी स्तर 10 नुसार निवड झालेल्या उमेदवारांना पगार दिला जाणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 50 तर महिलांसाठी 5 जागा आहेत. इंडियन आर्मीमध्ये एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांकडे एनसीसी सी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. उमेदवारानं भारत सरकारच्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून 50 टक्के गुणांसह पदवी मिळवलेली असणं आवश्यक आहे. पदवीच्या अंतिम वर्षाला शिकत असणारे उमेदवार देखील या पदासाठी अर्ज करु शकतात.तर उमेदवारांचं वय 19 वर्ष ते 25 वर्षांदरम्यान असणं आवश्यक आहे. 1 जुलै 2021 ला उमेदवार 19 वर्षांपेक्षा अधिक किंवा 25 वर्षांपेक्षा कमी वयाचे असावेत.

दरम्यान इंडियन आर्मीमध्ये एनसीसी स्पेशल एंट्री स्कीममध्ये उमेदवारांची कोणतीही परीक्षा होणार नाही. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना मुलाखतीला बोलावलं जाईल. सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड द्वारे मुलाखतीची प्रक्रिया राबवली जाईल. ही प्रक्रिया 5 दिवस चालते. त्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांना मेडिकल उत्तीर्ण व्हावं लागेल.

शेअर करा
Exit mobile version