बीड दि.२ – माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाभळगाव येथे एका २१ वर्षीय युवकाचा झोपेत असताना अज्ञात व्यक्तीने गळा कापल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. मारुती नारायण गाडेकर असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरु आहेत.
बाभळगाव येथील मारुती नारायण गाडेकर हा युवक गुरुवारी रात्री गावाशेजारील शेतात झोपला होता. रात्री १२ वाजेच्या सुमारास झोपेत असलेल्या मारुतीचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा कापला . अचानक हल्ला झाल्याने मारुती जागा झाला. यामुळे मारेकऱ्याने तेथून पळ काढला. मात्र, या हल्ल्यात मारुती गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सध्या औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती दिंद्रुड पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान सदरील घटना चोरीच्या उद्देशाने घडली की पूर्ववैमनस्यातून घडली याबाबत चर्चा सुरू आहेत.
दरम्यान, दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या सपोनि प्रभा पुंडगे, फौजदार विठ्ठल शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळावरून पोलिसांनी गुप्ती हस्तगत केली असून पुढील तपास सुरू आहे.