बीड दि.२८ – देशातील वैद्यकीय प्रवेशात ओबीसी विद्यार्थ्यांना 27 टक्के आरक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे दर वर्षाला राज्यातील 700 ते 800 विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.
देशभरातील ओबीसी लढ्याला मोठं यश आलं आहे. देशातील वैद्यकीय प्रवेशात ओबीसी विद्यार्थ्यांना 27 टक्के आरक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे.वैद्यकीय प्रवेशात ओबीसी विद्यार्थ्यांना 27 टक्के आरक्षणाबाबत पंतप्रधानांनी केंद्रीय शिक्षण मंत्री आणि सामाजिक न्यायमंत्र्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत, अशी माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी दिली आहे. यामुळे दरवर्षी महाराष्ट्रातील 700 ते 800 ओबीसी विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. देशभरात यामुळे हजारो ओबीसी विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे, असंही बबनराव तायवाडे म्हणाले.
दरम्यान केंद्रीय वैद्यकीय प्रवेश समितीने देशभरातील 177 वैद्यकीय महाविद्यालयांमधील केंद्राच्या राखीव जागांमध्ये केवळ 3.8 टक्केच आरक्षण ओबीसींना दिले आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून न डावलता त्यांना राष्ट्रीय कोट्यातील वैद्यकीय प्रवेशासाठी हक्काचे 27 टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केली होती.