केज दि.1 – जेष्ठ नागरिकांना एकटेपणा जाणवू नये. त्यांनाही कुठेतरी समवयस्क व्यक्तींबरोबर बसून गप्पा मारता याव्यात या उद्देशाने जेष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.आणि याचाच एक भाग म्हणून केज नगरपंचायत च्या वतीने केज शहरात नगरपंचायत चे मुख्याधिकारी सचिन देशपांडे यांच्या हस्ते विरंगुळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
विभागीय आयुक्त यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरीकांना एकत्र बसण्यासाठी सुलभ जागा, स्वतंत्र हॉल निश्चित करणे. त्या ठिकाणी सावलीची व्यवस्था, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृह, विश्रांतीची व्यवस्था, सतरंजी, खुर्च्या, दुरचित्रवाणी संच ठेवणे. तसेच ज्येष्ठ नागरीकांना वाचनासाठी दैनिक वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तके ज्यामध्ये कादंबऱ्या, नाटके, चरित्रग्रंथ, आत्मचरित्र, कविता संग्रह, – धार्मिक ग्रंथ, इ. तसेच मनोरंजनाचे साहित्य व बैठ्या खेळाचे साहित्य उपलब्ध करुन देणे. ज्येष्ठ नागरिकांकरिता आध्यात्मिक शिबीरे, योग साधना शिबीरे, ध्यानयोग शिबीरे, हास्य क्लब इ. आयोजित करणे इत्यादी बाबींसह इतरही कांही उपक्रम राबवण्यात येत आहेत.
त्यानुसार केज नगरपंचायत च्या वतीने शहरातील आदर्श प्राथमिक शाळेच्या बाजूला सचिन देशपांडे यांच्या हस्ते विरंगुळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी जेष्ठ नागरिकांना बसण्याची, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली असून या ठिकाणी येऊन जेष्ठ नागरिक आपल्या समवयस्क व्यक्तींबरोबर विचारांची देवाणघेवाण करतील.त्यामुळे त्यांच्यामध्ये आलेला एकाकीपणा जाऊन आरोग्यवर्धक जीवन जगण्यास मदत होणार असल्याचे मत देशपांडे यांनी व्यक्त केले.