चार शेतकऱ्यांसह तीन भाजप कार्यकर्ते व एका भाजप नेत्याचा मृत्यू…….!

लखनऊ दि.४ – गेल्या अनेक महिन्यांपासून केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. मात्र शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला आता हिंसक वळण लागलं आहे. उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरी येथे झालेल्या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या भेटीला निघालेल्या काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
मृत्यू झालेल्या 8 जणात 4 शेतकरी, 3 भाजप कार्यकर्ते आणि एका भाजप नेत्याचा समावेश आहे. या घटनेनंतर उत्तर प्रदेशच्या राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे. प्रियंका गांधी रात्री उशिराच लखनऊ येथे दाखल झाल्या. त्यानंतर त्या थोड्या वेळाने लखीमपूरच्या खीरीसाठी रवाना झाल्या. पण पोलिसांनी त्यांना हरगावजवळच अडवलं आणि ताब्यात घेतलं.झेड प्लस सिक्युरीटी सोडून प्रियंका गांधी ड्रायव्हरला घेऊन लपत छपत लखीमपूर खीरीच्या दिशेने रवाना झाल्या. पण सकाळी साडे पाचच्या सुमारास पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. अटक करायला आलेले पोलिस अधिकारी आणि प्रियंका गांधी यांच्यात जोरदार बाचाबाची देखील झाली. “माझं अपहरण करणार का? हेच का तुमचं लीगल स्टेटस? ऑर्डर आणा, मला धक्का देत जबरदस्ती आणलंय. ‘तुमच्या प्रदेशात नसलं तरी देशात कायदा आहे’, असं म्हणत प्रियंका गांधीनी अटकेला विरोध केला पण शेवटी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणात गरमा गरमी पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर शेतकरी आणि जनतेसह विरोधीपक्षातील राजकीय नेतेही संतापले आहेत. शेतकऱ्यांच्या भेटीसाठी निघालेल्या अनेक नेत्यांना पोलिस प्रशासनाने रस्त्यातच अडवलं. प्रियंका गांधी, भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आणि बसपाचे नेते सतीश मिश्रा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.