येत्या चार दिवसांत ‘या’ भागाला पुण्यासारखा पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता……!
पुणे दि.5 – परतीचे वेध लागलेल्या मान्सूनने सोमवारी रात्री पुणे जिल्ह्याला चांगलाच तडाखा दिला. अतिमुसळधार पावसामुळे अवघ्या एक ते दोन तासांमध्ये पुण्यातील अनेक भाग जलमय झाले होते. पावसाचा हा प्रचंड जोर पाहून अनेकांना धडकी भरली होती. येत्या चार दिवसांमध्ये राज्याच्या इतर भागांनाही पावसाचा असाच तडाखा बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.
मोसमी पाऊस या आठवड्यात राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मंगळवारी (5 ऑक्टोबर) रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, नगर, नाशिक, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.