पाण्यात बुडून सहा जणांचा मृत्यू…..!
शिर्डी दि.६ – पाण्यात बुडून एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना अहमदनगर जिल्ह्यात उघडकीस आल्या आहेत. तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये सहा जणांना प्राण गमवावे लागले आहेत. पती-पत्नी, बाप-लेक आणि सख्ख्या भावांचा यामध्ये समावेश आहे.
पाण्यात बुडून एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. यापैकी दोघा जणांचे मृतदेह सापडले आहेत, तर चौघांचा शोध सुरु आहे. श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथे मासेमारी करणाऱ्या दाम्पत्याचा मृत्यू झाला. ओढ्यातील पाण्यात बुडून पती-पत्नीला प्राण गमवावे लागले. दुसरीकडे, कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूरजवळील गांजावाडी येथील नाल्यात बुडून बाप-लेकाचा जीव गेला. तर राहुरीजवळील गणपती घाट येथे मुळा नदी पात्रात बुडाल्यामुळे दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला.
दरम्यान, नाशिकमधल्या रामकुंड परिसरात चार दिवसांत चौघांचा बुडून मृत्यू झाला आहे. गोदावरी नदी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्यात उतरुन धोका पत्करू नये, असे आवाहन पोलिस आणि प्रशासनाने केले आहे.