क्राइम
पैशासाठी दोन विवाहित महिलांचा छळ…..…!!!
केज दि. ६ – घर बांधकाम करण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये घेऊन का येत नाहीस, तुला मुलबाळ होत नाही या कारणावरून एका २५ वर्षीय विवाहित महिलेचा तिच्या सासरच्या लोकांनी शारीरिक मानसिक छळ करून तिला माहेरी आणून सोडल्याची घटना गाधवड ( ता. लातूर ) येथे घडली. याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
तटबोरगाव ( ता. अंबाजोगाई ) हे माहेर असलेल्या विद्या गणेश कदम या २५ वर्षीय महिलेचा विवाह गणेश गोविंद कदम ( रा. गाधवड ता. लातूर ) याच्याशी झालेला आहे. लग्नानंतर एक वर्षे चांगले नांदवून विद्या हिस घर बांधकाम करण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये घेऊन ये म्हणून पती गणेश कदम, सासरा गोविंद कदम, सासू केवळबाई कदम, नणंद सुरेखा मधुकर धुमाळ ( रा. निमगाव ता. अंबाजोगाई ), मनीषा विकास काळे ( रा. शिराळा ता. लातूर ) यांनी तगादा लावला. मात्र तिने तेवढी रक्कम आणण्यास नकार दिल्याने तुला मुलबाळ होत नाही, चारित्र्यावर संशय घेऊन तिला सतत शिवीगाळ व मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला. तीन लाख रुपये घेऊन नांदण्यास ये असे म्हणत तिला माहेरी आणून सोडले. अशी फिर्याद विद्या कदम हिने दिल्यावरून पती गणेश कदम, सासरा गोविंद कदम, सासू केवळबाई कदम, नणंद सुरेखा धुमाळ, मनीषा काळे या पाच जणांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सपोनि संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनात जमादार भगवान खेडकर पुढील तपास करत आहेत.
तर अन्य एका घटनेत तुझ्या आई – वडिलांकडून दोन लाख रुपये घेऊन का येत नाहीस या कारणावरून एका २९ वर्षीय विवाहित महिलेचा तिच्या सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक छळ करून तिला घराबाहेर हाकलून दिल्याची घटना पालशिंगन ( ता. जि. बीड ) येथे घडली. याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
शिंदी ( ता. केज ) माहेर असलेल्या सुनिता जयराम पिंपळे या महिलेचा विवाह पालशिंगन ( ता. जि. बीड ) येथील जयराम बारीकराव पिंपळे याच्यासोबत झालेला आहे. लग्नानंतर दीड वर्ष चांगल्या प्रकारे नांदविल्यानंतर तिचा पती जयराम पिंपळे, सासु मंगल पिंपळे, दिर किरण पिंपळे, नंनद अर्चना अशोक गरड ( रा. पांगरी ता. बार्शी ) यांनी संगनमत करून तुझ्यामुळे आमचे वडील वारले तु पनोती आहेस असे म्हणुन त्रास देण्यास सुरूवात केली. त्यानंतर तुझ्या आई – वडीलांकडून दोन लाख रुपये घेवुन ये असा तगादा लावून व चारित्र्यावर संशय घेवुन तिचा मानसिक व शारिरीक छळ करीत घरातुन हाकलुन दिले. अशी फिर्याद सुनीता पिंपळे यांनी दिल्यावरून पती तिचा पती जयराम पिंपळे, सासु मंगल पिंपळे, दिर किरण पिंपळे, नंनद अर्चना गरड या चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस नाईक बाळू सोनवणे हे करीत आहेत.