अंबाजोगाई दि.9 – तालुक्यातील पाटोदा व बरदापुर मंडळात शनिवारी (दि. ९) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला तर रस्त्यावर गुडघ्या एवढे पाणी साठले होते. सदरील पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही.
बीड जिल्ह्यात सर्व पिके वाया गेली असून ओला दुष्काळ सुदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवस पावसाने उघाड दिल्यानंतर शनिवारी दुपारी अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा व बरदापुर मंडळात जोरदार पाऊस कोसळला. मंडळात असलेल्या राडी, पाटोदा, नांदडी, कुंबेफळ, सातेफळ, ममदापूर, माकेगाव व देवळा या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने परिसरातील नद्यांना पूर आला आहे. नांदडी येथील नदी व पाटोदा येथील होळणा नदी तुडुंब भरून वाहू लागली आहे.
दरम्यान, पुराचे पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात घुसले असून शेतातील उरल्यासुरल्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतात सकाळी जनावरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांची जनावरे व शेतक नदीला पूर आल्यामुळे नदीच्या पलीकडे राहिले आहेत. एकूणच पाटोदा मंडळात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.