संभाजी भिडेंचे पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य……!

सांगली दि.15 – बेधडक वक्तव्यांनी खळबळ उडवून देणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांची जीभ पुन्हा घसरली. “पारतंत्र्य, गुलामी, दास्याच्या नरकात राहणाऱ्या बेशरम लोकांचा, एक अब्ज 23 कोटी लोकांचा हा देश आहे. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे” असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी सांगलीत केलं.
“जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला आपला देश, मग आपल्या देशाचा क्रमांक एक नंबर कधी येणार. तो क्रमांक एक आपण मिळवला आहे. कुठल्या गोष्टीत? लोकसंख्येमध्ये आपल्याला जमलं नाही, चीन पुढे आहे. जो आपला कट्टर दुश्मन, वैरी, मारेकरी, गनीम, शत्रू आहे, पण हिंदूना मेंदू असतो. यात आपला क्रमांक एक आहे. तो म्हणजे निर्लज्जपणात. जगाच्या पाठीवरती 187 राष्ट्र आहेत. त्या राष्ट्रात पारतंत्र्य, परदास्य, परवशता, गुलामी, दास्याच्या नरकात राहण्याचा बेशरमपणा, लाज वाटत नाही, अशा बेशरम लोकांचा, एक अब्ज 23 कोटी लोकांचा देश जगात आहे. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे” असं संभाजी भिडे सांगलीमध्ये दुर्गामाता दौडच्या समारोप प्रसंगी म्हणाले.