महाराष्ट्र
तुम मुझे कब तक रोकोगे…..! भक्तीगडावरून कडाडल्या पंकजा मुंडे……!
बीड दि.१५ – जिल्ह्यातील सावरगाव घाट इथे भक्तीगडावर माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा पार पडला. यावेळी पंकजा मुंडे यांनी घणाघाती भाषण करत मला कुणीही रोखू शकत नाही आणि घरात बसणाऱ्या पैकी नाही अश्या भावना ‘तुम मुझे कब तक रोकोगे’ म्हणत शेरोशायरी च्या माध्यमातून उपस्थितांची मने जिंकली.
खा.डॉ. प्रितम मुंडे यांनी प्रास्ताविक केल्यानंतर रासप चे महादेव जानकर यांनी रांगड्या शैलीत भाषण करून मुंडे भगिनींच्या पाठीमागे मरेपर्यंत राहणार असल्याचे बोलून दाखवले. तर माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी मी घरात बसणारी नसून मी फक्त कोरोनाच्या परिस्थितीत इतरांना कांही त्रास होऊ नये म्हणून सभा मेळावे घेतले नाहीत असे सांगितले. तर पुढच्या दिवसांतील माझे दौरे लिहून घ्या असे सांगत महाराष्ट्रभर फिरणार असल्याचे स्पष्ट केले.
मागच्या दोन वर्षांपासून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी परेशान असून त्यांच्या पदरात कांहीच पडले नसल्याचे सांगत सरकार पडणार तरणार या चर्चा बंद करून समाजच्या हिताचे बघा असा सल्ला देत भाजपसह विरोधी पक्षातील नेत्यांचे कान टोचले. महाविकास आघाडी सरकार मधील कांही मंत्र्यांनी त्यांचे मंत्रीपदे किरायाने दिले असल्याची टीका करत पालकमंत्र्यांनी जिल्हा वाऱ्यावर सोडल्याची तोफ डागली. तर उपस्थित समुदायाला तंबाखू मुक्तीचा संकल्प देत आपापल्या गावात गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या वतीने स्वच्छतेची जबाबदारी घेण्याचा शब्द घेतला.