आपला जिल्हा

वेळीच उपचार मिळाल्याने आदर्शचे वाचले प्राण…….! 

(तब्बल ५२ तास दिला व्हेंटिलेटर द्वारे कृत्रिम श्वास) 

डी. डी. बनसोडे

केज दि.६ – कोरोना मुळे शहरातील सर्व खाजगी रुग्णालय बंद  असतानाही तालुक्यातील नाहोली येथील सात वर्षीय  साप चावलेल्या मुलास डॉ. दिनकर राऊत यांनी उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल करून घेत त्याच्यावर वेळीच उपचार केल्याने त्याचे प्राण वाचले असून त्यास तब्बल ५२ तास व्हेंटिलेटर वर ठेवून कृत्रिम श्वास देण्यात आला.

          तालुक्यातील नाहोली येथील आदर्श बापूराव बावळ या सात वर्षीय मुलास १ मे च्या पहाटे पाचच्या सुमारास झोपेत असताना  क्रेट जातीचा साप चावला. त्यास  सकाळी सहाच्या दरम्यान वडिलांनी झोपेतून उठवत तोंड धुण्यास सांगितले असता त्याने हात दुखत असल्याचे सांगितले. तर थोड्याच वेळात त्याने घशात दुखत असल्याने चहा पिता येत नसल्याचे सांगितले. दरम्यान त्यास पालकाने उपचारासाठी केज येथे आणले असता शहरातील अन्य दवाखान्यात दाखवण्याचा प्रयत्न केला.मात्र कोरोनाच्या भीतीने बेशुद्ध अवस्थेतील आदर्शला कोणीही उपचारास दाखल करून घेतले नाही. शेवटी त्यास केज शहरातील योगिता बाल रुग्णालयात घेउन गेले असता तेथे बालरोग तज्ञ डॉ. दिनकर राऊत यांनी आदर्शची चिंताजनक अवस्था पाहत त्यास क्रेट जातीचा साप चावला असल्याचे निदान करत उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल कसरून उपचार सुरू केले. तब्बल  ५२ तास आदर्शला व्हेंटीलेटरद्वारे कृत्रिम श्वास दिल्या नंतर त्याने श्वास घेण्यास सुरू केले. नंतर त्याचे व्हेंटिलेटर काढण्यात आले.  दरम्यान कोरोना परिस्थिती मध्येही डॉ. दिनकर राऊत व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी झोपेत साप चावलेल्या आदर्शवर वेळीच उपचार केल्याने त्याचे प्राण वाचले आहेत.

पावसाळ्यात झोपताना दक्षता घ्यावी – डॉ. राऊत 

क्रेट जातीचा साप हा निशाचर असतो तो संध्याकाळी बाहेर निघतो व तो पहाटेच्या वेळी चावतो. त्याचा चावा वेदना रहित असतो. तर बाकीचे साप चावल्यावर वेदना होतात व सूज येते. मात्र  क्रेट जातीचा साप चावल्या नंतर रुग्णावर त्याची लक्षणे ही दहा मिनिटे ते तीन तासा पर्यंत दिसून येतात. क्रेट साप चावलेल्या रुग्णास गिळण्यास, श्वास घेण्यास त्रास होतो, नंतर विषाचा परिणाम होऊन श्वसनाचे स्नायू निकामी होऊन श्वसनक्रिया बंद होऊन रुग्णाचा मृत्यू होतो. अशा रुग्णास व्हेंटिलेटरद्वारे कृत्रिम श्वास देणे गरजेचे असते. हा साप एप्रिल ते जून दरम्यान निघत असल्याने नागरिकांनी पावसाळ्यात अंगणात जमिनीवर झोपू नये. बाजावर किंवा पलंगावर झोपावे असे डॉ. दिनकर राऊत यांनी सांगितले.

डॉ. दिनकर राऊत आमच्यासाठी देव – बापुराव  बावळ

कोरोना मुळे खाजगी दवाखाने बंद असतानाही डॉ. दिनकर राऊत यांनी आदर्शला रुग्णालयात दाखल करून घेत साप चावल्याचे निदान करत  त्यास तात्काळ व्हेंटिलेटर लावत कृत्रिम श्वास देऊन वेळीच उपचार केल्याने आदर्शचे प्राण वाचले.

त्यामुळे डॉ. दिनकर राऊत हे आमच्यासाठी देवच असल्याची भावना बापुराव बावळ यांनी व्यक्त केली

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close