आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ”त्या” मुलाचा मृतदेह बाहेर काढला…….!
केज दि.२५ – शहरातील क्रांती नगर भागाच्या वरच्या बाजूस असलेल्या पडीक विहिरीत एक ९ वर्षाचा मुलगा विहिरीत पडल्याच्या माहितीवरून दुपारी १२ वाजेपासून विहिरीतील पाणी उपसा सुरू होता. अखेर आठ तासांच्या अथक प्रयत्नातून त्या मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
शहरातील क्रांती नगर भागातील रहिवासी हिरा काळे यांचा बाबा नावाचा नऊ वर्षीय मुलगा दि.२५ रोजी दुपारी बाराच्या दरम्यान जवळच असलेल्या विहिरीवर आला होता व तिथेच थांबला होता. आणि याच वेळेत तो विहिरीत पडला. मात्र सदरील मुलगा विहिरीच्या काठावरून विहिरीत पडला असल्याचे एका लहान मुलीने त्याच्या कुटुंबियांना सांगितले. त्यावरून त्यांनी विहिरीत उतरून पाहिले परंतु विहिरीत पाच ते सहा पुरुष पाणी असल्याने तो दिसून आला नाही. सदरील घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर सफौ महादेव गुजर व पोना भोले यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दुपारपासून दोन मोटारी लावून विहिरीतील पाण्याचा उपसा सुरू होता.तर सायंकाळी ८ पर्यंत अर्धे अधिक पाणी उपसण्यात आले. तर पाणी कमी झाल्यानंतर कांही लोक खाली उतरले व त्याचा शोध घेतला असता मुलाचा मृतदेह आढळून आल्याने बाहेर काढला.
दरम्यान विहिरीत पाणी भरपूर असल्या कारणाने वेळ लागत होता. त्यामुळे कासावीस झालेले पालक विहिरीच्या काठावर बसून होते. मात्र पोलीस कर्मचारी व सदरील भागातील शकील सय्यद, भीमा शिंदे, बापू बचूटे, प्रेम गायकवाड, बबलू तांबोळी, लखन मस्के, लखन काळे इत्यादी तरुणांनी पालकांना धीर देत मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली. पोलीस कर्मचाऱ्यांनी सदरील मृतदेह शवविच्छेदनासाठी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती दिली.