औरंगाबाद मध्ये दिव्यांग क्रिकेट स्पर्धेला सुरुवात……!
औरंगाबाद दि.२६ – शहरात आजपासून तीन दिवस भारत-बांग्लादेश दरम्यान दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी साडे नऊ वाजता औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
शहरातील एमजीएमच्या मैदानावर आज भारत-बांग्लादेश या देशांदरम्यान दिव्यांग क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. या दोन्ही संघात तीन वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. आज मंगळवारी सलामीचा सामना एमजीएमच्या मैदानावर होत आहे. भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व बीडचा गुणवंत खेळाडू ज्योतिराम घुले हा करतोय. तर बांग्लादेशच्या संघाचे नेतृत्व सायमॉनकडे आहे. या क्रिकेट स्पर्धेसाठी बांग्लादेशचा दिव्यांग क्रिकेट संघ सोमवारी औरंगाबादमध्ये दाखल झाला आहे. बांग्लादेश संघ या दौऱ्यात भारताविरुद्ध वन डे, कसोटी आणि टी-20 सामने खेळणार आहे.
दरम्यान, भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचे नेतृत्व करण्याची संधी बीडच्या ज्योतिराम घुलेला मिळाली आहे. खेळातील कारकीर्दीच्या पदार्पणातच ज्योतिराम घुलेला ही संधी मिळाली आहे. त्यामुळे पदार्पणातच टीमला मालिका विजय मिळवून देणार, असा निश्चय केल्याची माहिती त्याने पत्रकार परिषदेत दिली. भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी दीपक जावळे यांची निवड झाली. भारतीय संघात या दोघांसह राजू चव्हाण, मनोज धोत्रे, जमीर पठाण हे पाच महाराष्ट्रीयन खेळाडू आहे . सामन्यांच्या सुरुवातीला भारतीय संघाने बॅटिंग घेतली असून 20 ओव्हरमध्ये भारतीय संघाने 127 धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या.