एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला संप मागे…….!
बीड दि.28 – गेले काही तास राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरु केलं होतं. हे आंदोलन करत एसटी वाहतूक सेवाही बंद ठेवण्याचा पवित्रा कर्माचाऱ्यांनी घेतला होता. यामुळे राज्यातील १५० पेक्षा जास्त एसटी महामंडळाच्या आगारातून एकही एसटी बाहेर पडली नव्हती. दिवाळीच्या तोंडावर झालेल्या अशा आंदोलनामुळे सर्वसामान्यांचे चांगलेच हाल झाले होते. अखेर मान्यताप्राप्त एसटी कर्मचारी संघटनेबरोबर परिवहन मंत्री अनिल परब यांनी चर्चा केल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आलं आहे.बीडमध्ये ही संघटनेकडून संप मागे घेण्यात आल्याचे सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या एकुण तीन मागण्या होत्या. नव्या वेतन करारानुसार महागाई भत्ता, घरभाडे भत्ता वाढवून द्यावा या दोन प्रमुख मागण्या होत्या. तर वेतन करारातील पगारवाढीचा चा मुद्दा आहे त्यावर दिवाळीनंतर चर्चा करण्यात येईल असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. तेव्हा या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे असंही आवाहन परब यांनी केलं.त्यानुसार हा संप मागे घेण्यात आल्याचे एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.त्यामुळे आता पुन्हा एकदा बस सेवा सुरळीत होणार असल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.