क्राइम
बसमधून महिलेच्या बॅगमधील ८० हजाराचे दागिने लंपास…….!
केज दि.३ – पुण्याहून माहेरी बसमधून चाललेल्या महिलेच्या बॅगमधील ८० हजार रुपयांचे दागिने अनोळखी तीन महिलांनी लंपास केल्याची घटना मस्साजोग ( ता. केज ) येथे २ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी तीन महिलांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
शीतल बाबुराव घोबाळे ( वय ३४, रा. ओमकार कॉलनी, हडपसर काळेपडळ तुकाई टेकडी ता. हवेली जि. पुणे ) ही महिला दिवाळीच्या सणासाठी माहेरी धर्मापुरी ( ता. अंबाजोगाई ) या गावी जाण्यासाठी चंदननगर , पुणे येथून पुणे – नांदेड या बसने ( एम. एच. २० बीएल ३९९३ ) २ नोव्हेंबर रोजी येत होती. बस चालकाच्या कॅबिनमध्ये बॅग ठेवून शीतल घोबाळे ह्या लहान मुलीला घेऊन वाहकाच्या बाजूच्या सीटवर बसून प्रवास करीत होत्या. नेकनूर येथून बसलेल्या तीन महिला ह्या बसमध्ये जागा नसल्याने चालकाच्या कॅबिनमध्ये त्यांच्या बॅगशेजारी बसल्या होत्या. बस ही मस्साजोग येथे आल्यानंतर नाश्त्यासाठी जगदंबा हॉटेलवर थांबली. यावेळी शीतल यांची मुलगी कुरकुरे पाकीट आणण्यासाठी खाली उतरल्याने तिला घेऊन येण्यासाठी उतरल्या. याचवेळी बॅगजवळ बसलेल्या महिलांनी कॅबिनमध्ये कोणी नसल्याची संधी साधून बॅग कापून बॅगमधील १७ ग्रॅमचे शॉट गंठण, साडेपाच ग्रॅमचे लॉकेट, एक ग्रॅमच्या दोन अंगठ्या असे ८० हजार रुपयांचे दागिने व नगदी ५ हजार रुपये काढून घेतले. माहेरी धर्मापुरी येथे गेल्यावर बॅगमधील समान काढीत असताना बॅग आतून फाटलेली दिसल्यावर बॅगमधील दागिन्याची खात्री केली असता दागिने लंपास केल्याचे दिसून आले. शीतल घोबाळे यांच्या फिर्यादीवरून अनोळखी तीन महिलांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार चाँद सय्यद हे पुढील तपास करत आहेत.