#Accident
मुरुमाच्या ढिगाऱ्यावर आदळून मोटारसायकल स्वाराचा मृत्यू……!
केज दि.४ – मेगा इंजिनीरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने रस्ता दुरुस्तीच्या ठिकाणी सूचना दर्शक फलक आणि बॅरिकेट्सच्या ऐवजी टाकलेल्या मुरूमाच्या ढिगाऱ्यावर मोटार सायकल गेल्याने रस्त्यावर पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने; एका मोटार सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
दि. ४ नोव्हेंबर गुरुवार रोजी रात्री ८:३० वा. दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यातील दादासाहेब दशरथ गायकवाड, वय ३५ वर्ष रा. दाभा ता. कळंब हा मोटार सायकल क्र. (एमएच-१४/सीबी-२१९५) वरून केज-कळंब रस्त्याने जात असताना सुर्डी पाटी जवळ रस्ता दुरुस्तीचे काम सूरु असलेल्या ठिकाणी; काम करणाऱ्या मेगा इंजिनीरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने रस्ता सुरक्षेची किंवा बाजूने सुरळीत वाहतूक सुरू ठेवण्यासाठी व सावकाश वाहन चालविण्याचे सूचना देणाऱ्या रेडीयमच्या फलकाच्या ऐवजी रस्त्यावर निष्काळजीपणे मध्यभागी टाकलेल्या मुरुमाच्या ढिगावर गाडी जाऊन पडली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन झालेल्या अति रक्तस्त्रावामुळे दादासाहेब गायकवाड याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे व त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी घटना स्थळावर हजर होऊन पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह खाजगी रुग्णवाहिकेतून उप जिल्हारुग्णालय केज येथे हलविला. या वेळी आयबाईक टीमचे सचिन अहंकारे आणि पोलीस गस्ती पथकातील नागरगोजे यांनी व माळेगाव येथील नागरिकांनीही अपघाताच्या ठिकाणी उपस्थित राहून मदत केली.
दरम्यान, दादासाहेब गायकवाड यांचा मृतदेह हा उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन जाताना रस्त्याचे काम करणाऱ्या गुत्तेदारावर कठोर कारवाई झाल्या शिवाय मृतदेह जाग्या वरून हलवू देणार नाही अशी भूमिका घेतली होती. मात्र सपोनि आटोळे यांनी नातेवाईकांची समजूत काढली व मृतदेह दवाखान्यात आणला.