नोव्हेंबर नंतर ”या” योजनेतील रेशन बंद होण्याची शक्यता……!

नवी दिल्ली दि.5 – प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना म्हणजेच PMGKAY अंतर्गत, गरिबांना नोव्हेंबर नंतर मोफत रेशन मिळणार नाही. खरं तर, केंद्र सरकारचे अन्न आणि ग्राहक व्यवहार सचिव सुधांशू पांडे यांनी शुक्रवारी सांगितले की,”या योजनेअंतर्गत मोफत रेशनचे वितरण नोव्हेंबरच्या पुढे वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.” पांडे म्हणाले की,”देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहे, त्यामुळेच मोफत रेशन देण्याच्या योजनेचा पाठपुरावा करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.”
या योजनेंतर्गत गेल्या वर्षभरापासून गरीब कुटुंबांना केंद्र सरकारकडून मोफत रेशन दिले जात आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना जाहीर करण्यात आली होती. सुरुवातीला ही योजना एप्रिल-जून 2020 या कालावधीसाठी सुरू करण्यात आली होती, मात्र नंतर ती 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली. अन्न सचिव म्हणाले, “अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याने आणि आमची OMSS (Open Market Sale Scheme) देखील यावर्षी चांगली राहिली आहे. त्यामुळे PMGKAY वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.”PMGKAY अंतर्गत, 80 कोटींहून अधिक लोकांना दरमहा 5 किलो मोफत गहू/तांदूळ आणि प्रत्येक कुटुंबाला 1 किलो मोफत संपूर्ण हरभरा डाळ दिली जात आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत 80 कोटी रेशनकार्डधारकांना मोफत रेशनसाठी ओळख देण्यात आली आहे. त्यांना रेशन दुकानांमधून वितरीत करण्यात येणाऱ्या अनुदानित धान्याव्यतिरिक्त मोफत रेशन दिले जाते.