फोटो काढण्याच्या नादात 17 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू…….!

अंबाजोगाई दि.१० – दिवाळीच्या सुटीनिमित्त आजोळी आलेल्या १७ वर्षीय मुलाचा अंबाजोगाई येथील नागनाथ मंदिराच्या मागील धबधब्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.१०) सायंकाळी घडली.
अमर अनिल राडकर (वय १७, रा. जोडजवळा, जि. लातूर) असे त्या मृत मुलाचे नाव आहे. दिवाळीच्या सुटीनिमित्त तो आजोळी आडस (ता. केज) येथे आला होता. बुधवारी दुपारी तो दर्शनासाठी दोन मावस भावांसह अंबाजोगाईच्या नागनाथ मंदिरात आला होता. त्यानंतर सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास तिघेही मंदिराच्या पाठीमागील धबधब्याकडे फोटो काढण्यासाठी गेले. यावेळी अमर पाण्यात उतरला, परंतु खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. त्याचा भावांनी आरडाओरडा केला परंतु जवळपास कोणीच नसल्याने अमरला मदत मिळू शकली नाही. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने शोध घेऊन रात्री ८.३० वा. अमरचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठविण्यात आला. अमर हा त्याच्या मातापित्यांचा एकुलता एक मुलगा असल्याचे समजते.