रिकामे भासणाऱ्या लसीकरण केंद्रांवर आता नागरिकांच्या रांगा..……!
औरंगाबाद दि.११ – कोरोना प्रतिबंधक लसीकरणात औरंगाबाद जिल्हा लक्षणीय पद्धतीने मागे राहिल्याने जिल्हाधिकारी आणि महापालिका प्रशासनाने कालपासून शहर व जिल्ह्यात सक्तीची नियमावली लागू केली आहे. लसीचे प्रमाणपत्र नसलेल्यांना रेशन, पेट्रोल, प्रवास, आरोग्यसेवा, हॉटेलिंग आदी सर्व सेवा मिळणार नाहीत. तसेच कोणत्याही प्रशासकीय कार्यालयात अशा व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. पर्यटन स्थळांवरही लसीचे प्रमाणपत्र अनिवार्य असल्याची नियमावली जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली होती. एकाच दिवसात या नियमाचा चांगला परिणाम दिसून आला. एवढे दिवस रिकामे भासणाऱ्या लसीकरण केंद्रांवर आता नागरिकांच्या रांगा दिसू लागल्या.
शहरातील क्रांती चौकातील आरोग्य केंद्रावर मंगळवारी 90 जणांचे लसीकरण झाले. या ठिकाणी बुधवारी दुपारपर्यंत 120 नागरिकांचे लसीकरण झाले होते. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांची ही संख्या जास्त होती, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमरज्योती शिंदे यांनी सांगितले. तर जवाहर कॉलनी आरोग्य केंद्रावरदेखील दिवसभरात 122 जणांचे लसीकरण झाले. दुपारनंतरही येथे नागरिकांची लांब रांग लागली होती.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी सक्तीच्या सूचना काढल्यानंतर नागरिकांमध्ये जनजागृती व्हायला सुरुवात झाली आहे. येत्या काही काळात लसीकरणासाठी केंद्रावर जास्तीत जास्त नागरिक येतील, अशी आशा आहे. सध्या शहरात लसीचा पुरेसा साठा आहे. तसेच लसीकरणासाठी आवश्यक मनुष्यबळाचाही कोणताही प्रश्न नाही. शहरात लसीकरणाचे 100 टक्के उद्दिष्ट येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या आरोग्य विभागाने कंबर कसली असून महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार, आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.