हवामान

अतिवृष्टीने खरीप पिके गेली मात्र भूजल पातळी वाढली…….

बीड दि.14 – अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असले तरी मराठवड्यातील सर्वच जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा मिटलेला आहे. एवढेच नाही तर भूजल पातळीत वाढ झाली असून याचा रब्बी हंगामातील पिकांना मोठा फायदा होणार आहे. सलग दुसऱ्या वर्षी सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने मराठवाड्याच्या पाणीपातळीत 2.79 मीटरने वाढ झालेली आहे. यंदाही वरुणराजाची मराठवाड्यावरच कृपादृष्टी राहिलेली आहे.

यंदा अतिवृष्टी आणि सततच्या पावसाचा परिणाम काय झाला हे आता प्रकर्षाने जाणवत आहे. पावसामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पण लातूरसारख्या आवर्षणग्रस्त भागातही जलसाठे तुडुंब भरुन वाहत आहेत. मराठवाड्यात सर्वाधिक भूजल पातळी ही लातूर जिल्ह्यात वाढलेली आहे. तब्बल 4.37 मीटरने पाणीपातळी वाढली आहे तर सर्वात कमी हिंगोलीची 1.16 मीटरने वाढली आहे. त्यामुळे खरिपासाठी नुकसानीचा ठरलेला पाऊस आता रब्बी हंगामातील पिकांसाठी फायद्याचा ठरणार आहे.

मराठवाड्यात पावसाविना पिके वाया जातात असेच दरवर्षीचे चित्र असते. यंदा मात्र, परस्थिती बदलली असून अधिकच्या पावसामुळे खरिपातील सोयाबीन, उडीद, मूग या पिकांचे नुकसान झाले होते. मराठवाड्यात पावसाची सरासरी ही 679.5 मिमी असते. यावेळी मात्र, 1112.4 मिमी पाऊस मराठवाड्यात बरसलेला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात 2.3 मीटरवर असलेली पाणीपातळी ही थेट 4.37 वर गेलेली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा तर प्रश्न मिटलेलाच आहे पण प्रकल्पातील शेतीसाठी असलेले राखीव पाणी यंदा देण्याचा निर्णय झाला आहे.

पावसामुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाले असले तरी मराठवाड्यातील प्रकल्प हे यंदा तुडूंब भरले होते. त्यामुळे यंदा शेतीसाठी राखीव ठेवण्यात आलेले पाणीही दिले जाणार आहे. पाणीसाठा तर मुबलक आहे. हवामान पोषक राहिले तर रब्बी हंगाम जोमात येणार आहे. यंदा उशीराने रब्बीच्या पेरण्या होत आहेत. त्यामुळे गहू आणि हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज आहे. शिवाय पाणीसाठा असल्याने उत्पादनातही वाढ होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, मराठवाड्यात सर्वाधिक भुजल पातळीत वाढ लातूर जिल्ह्यात झाली आहे. अतिवृष्टी आणि पावसामध्ये सातत्य यामुळे 4.37 मिमी ने पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ परभणीत 3.94 मिमी, बीड 3.16 मिमी, उस्मानाबाद 3.85, नांदेड 1.21 तर सर्वात कमी हिंगोली जिल्ह्याची 1.16 मिमी ने वाढ झाली आहे. पण या भुजल पातळीच्या वाढीमुळे पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close