शेती
केज तालुक्यातील शेतकऱ्यांचे अनुदान दिवाळीपूर्वीच आले,मग अद्याप खात्यावर जमा का झाले नाही…..?
केज दि.16 – मागच्या दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. केज तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी प्राप्त झालेले अनुदान दिवाळी पूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असे सांगितले गेले, मात्र अद्यापही ते जमा झाले नसून यामागे अनेक कारणे सांगितल्या जात आहेत.
केज तालुक्यासाठी एकूण ९६७८९ शेतकऱ्यांसाठी ६९ कोटी ४५ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा निधी महसूल विभागाला प्राप्त झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी अनुदान मिळावे यासाठी लागलीच सदरील रकमेचे धनादेश व शेतकरी यादीची प्रक्रिया पूर्ण केली. आणि उद्या दुपारपर्यंत सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार असल्याची माहिती तहसीलदार मेंडके यांनी दि.१ नोव्हेंबर रोजी दिली होती. परंतु तालुक्यातील 132 गावांमधील सुमारे 85 हजार शेतकऱ्यांच्या याद्या आणि धनादेश जेंव्हा डीसीसी बँकेकडे देण्यात आल्या तेंव्हा हजारो शेतकऱ्यांचे खाते नंबर चुकीचे देण्यात आल्याचे निदर्शनास आले. तर कांही खातेदारांचे नावेही चुकलेली असल्याचे दिसून आल्याचे बँकेच्या वतीने सांगण्यात येत आहे. तसेच सॉफ्ट कॉपी दिली नसल्याचेही सांगितले जात आहे. मात्र तसे कांही झाले नसल्याचे महसूल विभागाच्या वतीने सांगण्यात येत असून यामध्ये शेतकरी मात्र भरडल्या जात आहेत.
दरम्यान, केज तालुक्यात डिसीसी बँकेच्या एकूण सात शाखा असून आज दि.16 पर्यंत जेमतेम 30 गावांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले असून सर्व गावांसाठी आणखी किमान एक महिना तरी वेळ लागण्याची शक्यता आहे. सदरील विलंबाबाबत तहसीलदार दुलाजी मेंडके यांना विचारणा केली असता, येत्या दोन दिवसांत एक बैठक बोलावून आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांचे अनुदान खात्यावर जमा करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे डिसीसी बँकेचे तालुका नियंत्रक राजेश मुळे यांनी सांगितले.