#Vaccination
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या फोननंतर इंदुरीकर महाराजांनी आपले वक्तव्य घेतले मागे……!
बीड दि.१८ – ”मी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नाही आणि घेणारही नाही” असे वक्तव्य केल्यानंतर इंदुरीकर महाराजांना मोठ्या टिकेला सामोरे जावे लागले होते. परंतु खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी इंदुरीकर यांच्या सोबत फोनवर बोलून चर्चा केल्यानंतर इंदुरीकर यांनी उपरती झाली असून लस घेण्याबद्दल जनजागृती करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या हाहाकारात संपूर्ण देश होरपळून निघाला. सुमारे दोन वर्षे केंद्र आणि राज्य सरकार मेटाकुटीला आले. संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली तर लाखो कुटुंबातील लोकांना आपला जीव गमवावा लागला. महत प्रयासाने कोरोना प्रतिबंधक लस निर्माण करण्यात आली. नागरिकांना लस देण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत. वेगवेगळ्या मार्गाने लस सर्वांनी घ्यावी यासाठी जनजागृती केली जात आहे.मात्र लस घ्या असे म्हणण्याऐवजी मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही असे वक्तव्य करून इंदुरीकर यांनी वाद ओढवून घेतला. त्यांच्या या वक्तव्यावर संपूर्ण महाराष्ट्रात टीकेची झोड उठली. बीड जिल्ह्यातील एकाने तर इंदुरीकर महाराज स्वतः जोपर्यंत लस घेत नाहीत तोपर्यंत त्यांच्या किर्तनावर बंदी घालण्याची मागणी केली.
मात्र या गदरोळानंतर खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी इंदुरीकर यांच्या बरोबर फोनवरून चर्चा करत आपण असे वक्तव्य करू नका. उलट आपण लस घेण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे असे सांगितल्यानंतर इंदुरीकर यांना उपरती झाली असून मी आता असे वक्तव्य करणार नाही, तर लस घ्यावी यासाठी जनजागृती करणार असल्याचे कबूल केल्याने तूर्त वादावर पडदा पडला असल्याचे दिसून येत आहे. तसेच वेगवेगळ्या धर्मगुरूंची लसीकरण मोहिमेला वेग आणण्यासाठी मदत घेणार असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच बॉलिवूड चा सुपरस्टार सलमान खान यांच्यावरही सरकारने मोठी जबाबदारी सोपवल्याचे सांगितले.