आश्चर्य….. उस्मानाबाद मध्ये एकाच घरात राहतात राष्ट्रपती आणि पंतप्रधान……!
उस्मानाबाद दि.22 – नावात काय आहे? या शेक्सपियरच्या विधानावर अनेक चर्चासत्र झडली असतील. अनेक विद्वान आणि अभ्यासकांनी त्याचा किस पाडला असेल. मात्र, माणूस किंवा कुठलीही वस्तू नावानेच तर ओळखली जाते, असं सर्वसामान्य बोलून जातात. मात्र, उस्मानाबादेत सध्या दोन नावांची चांगलीच चर्चा सुरु आहे आणि दुसरं म्हणजे एकाच घरात राष्ट्रपती आणि पंतप्रधान जन्माला आलेत! तुम्ही म्हणाल हा काय प्रकार? तर त्याचं झालं असं की, उस्मानाबाद जिल्ह्यातील चौधरी कुटुंबानं आपल्या मुलांची नावं थेट राष्ट्रपती आणि पंतप्रधान अशी ठेवली आहेत. ते ही पाळण्यात घालून, अगदी परंपरेनुसार….!
उस्मानाबादच्या उमरगा तालुक्यातील चिंचोली (भूयार) गावातील दत्ता आणि कविता चौधरी यांनी आपल्या बाळाचं “पंतप्रधान” असं नामकरण केलंय! इतकंच नाही तर त्यांच्या पहिल्या मुलाचं नावही ‘राष्ट्रपती’ असं आहे. त्यामुळे आता राष्ट्रपती आणि पंतप्रधान हे दोघे एकाच कुटुंबात वाढणार आहेत! ग्रामीण भागात बाळाचा नामकरण सोहळा मोठ्या थाटामाटात केला जातो. त्यासाठी खास पाळणा, आकर्षक सजावट केली जाते, पै-पाहुण्यांना निमंत्रण दिलं जातं. मग बाळाच्या कानात कुरररर करुन त्याचं नाव ठेवलं जातं. ही परंपरा जपत अगदी उत्साहात चौधरी कुटुंबाने आपल्या दोन्ही मुलांचा नामकरण सोहळा केलाय.
अलीकडच्या काळात राजकीय नेते मंडळी, चित्रपटातील अभिनेते-अभिनेत्री, फार तर देवादिकांची नावं आपल्या बाळाला दिली जातात. मात्र, देशाच्या सर्वोच्च पदाची नावंच आपल्या बाळाला देण्याचं काम दत्ता आणि कविता चौधरी यांनी केलं आहे. त्यामुळे ‘राष्ट्रपती’ आणि ‘पंतप्रधान’ हे दोघे भाऊ आता एकाच घरात बागडताना दिसणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे चौधरी कुटुंबाने आपल्या पहिला मुलाचं अर्थात ‘राष्ट्रपती’चं आधार कार्डही बनवून घेतलं आहे.उस्मानाबादेतील एका दाम्पत्याने आपल्या बाळांची नावं राष्ट्रपती आणि पंतप्रधान ठेवली आहेत.
दरम्यान,सध्या देशाच्या राजकारणात पदांसाठी होणारी रस्सीखेच तुम्ही-आम्ही पाहतच असतो. मात्र, इथे राष्ट्रपती आणि पंतप्रधान एकाच छताखाली गुण्यागोविंदाने राहणार आणि वाढणार आहेत. या दोन्ही बाळाचे वडील दत्ता चौधरीही फक्त मुलांचं नामकरण करुन मोकळे झाले नाहीत. तर त्यांना भविष्यात आपल्या मुलांना राष्ट्रपती आणि पंतप्रधान करायचं आहे.